पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी चालकांची जामिनासाठी न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:58 AM2017-09-18T05:58:44+5:302017-09-18T05:58:50+5:30
पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पेट्रोलपंप मालकांविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून, ‘रडार’वर असलेल्यांपैकी १२ मालकांसह दोन व्यवस्थापक आणि एक तंत्रज्ञ (टेक्निशिअन) अशा १५ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पंकज रोडेकर ।
ठाणे : पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पेट्रोलपंप मालकांविरोधात अटकेची कारवाई सुरू केली असून, ‘रडार’वर असलेल्यांपैकी १२ मालकांसह दोन व्यवस्थापक आणि एक तंत्रज्ञ (टेक्निशिअन) अशा १५ जणांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण न्यायालयात धाव घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पेट्रोलपंपांवरील डिझेल-पेट्रोल डिस्पेन्सिंग युनिटमधील पल्सरकार्ड, मदरबोर्ड, कंट्रोल की पॅड यामध्ये फेरफार करून ग्राहकांना कमी डिझेल-पेट्रोल वितरित होत असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले होते. या प्रकरणी १७ जून २०१७ रोजी डोंबिवलीत पहिली कारवाई करीत, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर, राज्यभरात ठाणे पोलिसांनी छापे टाकण्यास सुरुवात केली. महाराष्टÑातील २१ जिल्ह्यांत तर ओडिशा राज्यातील २ ठिकाणी इंडियन आॅइल ८७ पंप, हिंदुस्थान पेट्रोलियम ६९ पंप, भारत पेट्रोलियम १४, एरसार पेट्रोलियम ८ पंप अशा एकूण १७८ पेट्रोलपंपांवर कारवाई केली आहे. ही कारवाई करताना, ठाणे पोलिसांनी २४ जणांना अटक केली. त्यापैकी २३ जणांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्रही सादर करण्यात आले. या कारवाईनंतर पोलिसांनी संबंधित पेट्रोलियम कंपनीकडे दोषी युनिट तपासणीसाठी पाठविले होते. त्या कंपनीच्या अहवालात सध्या ४७ जण पोलिसांच्या ‘रडार’वर आले. त्यानुसार, ११ सप्टेंबर रोजी पहिली कारवाई केली. अशा प्रकारे नुकत्याच तीन कारवाया करत, एकूण तीन मालकांसह पाच जणांना अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींचा आकडा आता २९ वर गेला आहे. त्यापैकी २७ जणांची न्यायालयीन कोठडीमुळे कारागृहात रवानगी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या ‘रडार’वरील मालकांवर कारवाईचा बडगा उगारून, एका आमदाराच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे उर्वरित ४२ जणांवर कोणत्याही क्षणी अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असल्याने, त्यापैकी १५ जणांनी अटक होऊ नये, यासाठी त्यांना न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून अर्ज केला आहे.
>डंबरूधरला पोलीस कोठडी
तंत्रज्ञ डंबरूधर याला रविवारी न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डंबरूधर याने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांचे पथक ओडिशाला दाखल होऊन, २२ पंपांची तपासणी करणार आहेत.