कल्याण-डोंबिवलीत ई-बीटमार्शलद्वारे पेट्रोलिंग

By admin | Published: January 13, 2017 06:32 AM2017-01-13T06:32:25+5:302017-01-13T06:32:25+5:30

अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीस दलापुढे एक मोठे आव्हान आहे.

Petroling through Kalyan-Dombivli E-Beat Marshal | कल्याण-डोंबिवलीत ई-बीटमार्शलद्वारे पेट्रोलिंग

कल्याण-डोंबिवलीत ई-बीटमार्शलद्वारे पेट्रोलिंग

Next

आकाश गायकवाड / डोंबिवली
अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे पोलीस दलापुढे एक मोठे आव्हान आहे. ते लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सध्या अत्याधुनिक उपकरणांचा आधार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कल्याण परिमंडळ-३ च्या पोलिसांनी ई-बीटमार्शल पेट्रोलिंग संकल्पना राबवली आहे. त्यासाठी त्यांनी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस (आरएफआयडी) आधार घेतला आहे. परिमंडळाच्या आठही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ७०० ठिकाणी सेन्सर टॅग पॉइंट बसवले आहेत. यामुळे पेट्रोलिंगची थेट नोंद पोलीस ठाण्यात होत आहे.
कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी रत्नागिरीत पोलीस अधीक्षक असताना ही संकल्पना राबवली होती. ती यशस्वी झाल्याने आता ती त्यांनी कल्याणमध्येही अमलात आणली आहे. पोलीस कर्मचारी, बीटमार्शल नीट गस्त घालत नाहीत, मनमानी करतात, आदी प्रकारच्या नागरिकांच्या नेहमीच तक्रारी असतात. शिवाय, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, या उद्देशाने शिंदे यांनी गस्तीवर भर दिला. त्यासाठी त्यांनी आरएफआयडीचा आधार घेतला आहे. वायरलेस इन्फोटेक या कंपनीने आरएफआयडी या उपकरणाचे सेन्सर टॅग पॉइंट शहरात ७०० ठिकाणी माफक दरात बसवून दिले आहे. परिमंडळातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तीन ते चार बीटमार्शल आहेत. एका बीटमार्शलला किमान २५ ठिकाणी भेट देणे बंधनकारक आहे. हे टॅग पॉइंट शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांचा परिसर, मंदिर, मशिदी, बँका, एटीएम मशीनबाहेर, टपाल कार्यालयांजवळ, सोनेचांदीच्या पेढ्यांजवळ, प्रत्येक चौक, गर्दीच्या ठिकाणी बसवले आहेत.
या नवीन प्रणालीमुळे बीटमार्शल पोलिसांना स्वत:च्या मर्जीनुसार पेट्रोलिंग करता येत नाही. त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या मार्गानुसारच पेट्रोलिंग करावे लागते. सेन्सर टॅग पॉइंट बसवलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना त्यांच्याकडील मोबाइल डिव्हाइस मशीन त्या टॅग पॉइंटला स्पर्श करावा लागतो. त्याची नोंद थेट पोलीस ठाण्यात होते. टॅग पॉइंट बसवलेल्या ठिकाणी संबंधित पोलिसाने किमान १० मिनिटे थांबून नागरिकांशी संवाद साधणेही आवश्यक आहे. पोलीस ठाण्याच्या संगणकात जमा झालेल्या माहितीचा तपशीलवार अहवाल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि कल्याण पोलीस उपायुक्तांकडे सकाळी आणि रात्री पाठवला जातो. त्यामुळे बीटमार्शलने आपल्या कामात कामचुकारपणा केला, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
पूर्वी बीटमार्शल पोलिसांवर नियंत्रण ठेवणे मुश्कील होते. आता त्यांच्यावर सेन्सर टॅग पॉइंट मशीनमुळे नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. गस्त घालणाऱ्यास कोणताही पॉइंट टाळता येत नाही. दिवसभरात दोन ते तीन वेळा हमखास पोलीस संपूर्ण शहरात गस्त घालतात. त्यामुळे चोऱ्या, घरफोड्या, वाहनचोरी, मुलींची छेड, सोनसाखळी, कारटेपचोरी अशा गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय घट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Web Title: Petroling through Kalyan-Dombivli E-Beat Marshal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.