रद्दी साहित्यावरून पेटला वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:25 AM2018-01-22T02:25:59+5:302018-01-22T02:26:08+5:30
मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.
ठाणे : मराठी साहित्य क्षेत्रातील समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी अंबाजोगाई येथील मराठवाडा विभागीय साहित्य संमेलनात हल्ली प्रकाशित होणा-या पुस्तकांपैकी ८० ते ९० टक्के पुस्तके किलोच्या भावाने रद्दीत विकण्याच्या लायकीची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. मराठी सारस्वतात या विधानाच्या समर्थनार्थ किंवा विरोधात पडसादही उमटले नाहीत इतके आपले लेखक, साहित्यिक, समीक्षक गोठून बर्फाचे गोळे झाले आहेत. ‘लोकमत’ने मराठीमधील दोन नामांकित प्रकाशकांना या विषयावर जाणीवपूर्वक बोलते केले...
समीक्षकांनी ‘मृत्युंजय’, ‘ययाती’लाही नाकं मुरडली होती-
अशोक कोठावळे,
(मॅजेस्टीक प्रकाशन)
वाचन हे व्यक्तीनुरूप बदलत असते. समीक्षकांना वाटते तेच साहित्य असते का? तर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’, असे आहे. प्रसिद्ध होणारी ८० ते ९० टक्के पुस्तके रद्दीत किलोच्या भावाने विकण्याच्या लायकीची असतात, असे समीक्षक, लेखक पाटील यांचे मत आहे. ८० ते ९० टक्के हे मोठे प्रमाण झाले. मग शिल्लक काय राहतं?
वाचक घडवणे आवश्यक आहे आणि वाचक घडवण्यासाठी पुस्तके निर्माण व्हावी लागतात, नवनवीन साहित्य निर्माण व्हायला हवे. एक व्यक्ती असे ठरवू शकत नाही. सर्व पुस्तकांचे साहित्य निर्माण व्हावे, लोकप्रिय साहित्य निर्माण व्हावे. चेतन भगतला मराठी समीक्षकांची मान्यता मिळणारच नाही; पण त्याच्या साहित्याची तरुणांना गरज आहे. साहित्य निर्मिती न झाल्यास वाचन संस्कृती लयाला जाईल. मृत्युंजयलाही समीक्षकांची मान्यता मिळाली नव्हती. लोकप्रिय साहित्य समीक्षकाला आवडेलच असे नाही आणि समीक्षकाला आवडलेले साहित्य लोकप्रिय होईलच, असे नाही. ‘ययाती’वरही मोठी टीका झाली होती. परंतु लोकप्रिय साहित्य निर्मितीची साहित्य व्यवहाराला गरज आहे. समीक्षकांच्या दृष्टीने ते टाकाऊ असू शकते. लेखन ही स्फूर्ती असते ते आतून येत असते. मान्यवर लेखकांप्रमाणे नवोदित लेखकांचीही पुस्तके येत असतात. पाटील यांच्या विधानामुळे प्रकाशकांच्या पुस्तक निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नाही. त्यांचे विधान त्यांच्यापुरते आहे. याने साहित्य व्यवहारावर काहीही परिणाम होणार नाही.
नव्या कवी, लेखक कितीही टीका झाली तरी त्यांचे लिखाण थांबणार नाही. जे स्फुरतं तो ते लिहिणारच. समीक्षक त्याला काय म्हणतील हा नंतरचा मुद्दा आहे. बºयाच समीक्षकांनी अशी विधाने केली आहेत. तरीही नवीन लेखक नाऊमेद होणार नाहीत.
प्रकाशन संस्था आपले निकष बाळगून वेगवेगळ्या प्रकारांची पुस्तके प्रकाशित करीत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा आमच्यावर फारसा परिणाम होणार नाही, तसा संबंधच नाही. प्रत्येक प्रकाशन संस्थेचे स्वत:चे लेखकही असतात.
नवलेखकांना नाउमेद करू नये-
- अमोल नाले, (अनघा प्रकाशन)
समीक्षकांची मतं ही वेगवेगळी असू शकतात. चंद्रकांत पाटील यांनी कोणती पुस्तके वाचून हे मत बनवले मुद्दा आहे. त्यांच्या विधानाने वाद वाढू शकतात. त्यांच्याकडे कोणती पुस्तके आहेत याची पडताळणी करायला हवी. त्यांनी अंबाजोगाईला झालेल्या मराठवाडा विभागीय संमेलनात केलेले विधान हे नवीन लेखकांना नाउमेद करणारे आहे. उलटपक्षी पाटील यांनी नवीन लेखकांना उमेद देण्याची गरज आहे. नवीन लेखकांचे लेखन हे उत्तम आहे यात वाद नाही. नवीन लेखकांना पुरस्कारही मिळाले आहेत. प्रकाशक पुस्तके प्रकाशित करताना ते वाचून. पुस्तक समाजाला कसे उपयुक्त ठरेल, याचा विचार केला जातो. प्रकाशक हा पुस्तकांचे मूल्य जाणतो. निकृष्ट दर्जाच्या पुस्तकांचे प्रस्ताव येत असतात पण तो विषय फार महत्त्वाचा वाटत नाही. प्रकाशक जे छापतो ते समाजोपयोगी असते. त्यातून पुढची पिढी घडावी हा उद्देश डोळ््यासमोर असतो. चांगले वाचन असेल तर पुढची पिढीही चांगली घडते. शहर, ग्रामीण भागांतील पुस्तकांचा दर्जा अजिबात घसरलेला नाही. ग्रामीण भागांतून भरपूर लेखक तयार झाले आहेत, ते चांगले लिहितात.