उल्हासनगर व ठाणे जिल्ह्यात बंदी असलेल्या गुंडाचा फोटो उपमुख्यमंत्र्या सोबत व्हायरल; चर्चेला उधाण
By सदानंद नाईक | Published: March 7, 2023 04:28 PM2023-03-07T16:28:11+5:302023-03-07T16:28:22+5:30
ठाणे जिल्हा बंदीच्या शर्तीवर न्यायालयाच्या जामिनावर असलेला गुंड रोशन झा याचा फोटो शहर भाजपा पदाधिकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसात हडकंप उडाला.
उल्हासनगर : ठाणे जिल्हा बंदीच्या शर्तीवर न्यायालयाच्या जामिनावर असलेला गुंड रोशन झा याचा फोटो शहर भाजपा पदाधिकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसात हडकंप उडाला. व्हायरल झालेला फोटो गुंड रोशन झा याचाच असल्याची कबुली उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फुलपगारे यांनी दिली.
उल्हासनगर खेमानी परिसरात राहणारा रोशन झा याच्यावर सन २०१४ ते २०१९ दरम्यान गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांदवी ३०७ गुन्हा दाखल होऊन त्याला जेल झाली होती. उच्च न्यायालयाने उल्हासनगरसह ठाणे जिल्हा बंदीच्या अटी-शर्तीवर रोशन झा याला गेल्या ऑक्टोबर महिन्यात जामीन दिला. दरम्यान गेल्या आठवड्यात केंद्रीयमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात रोशन झा याचा भाजप शहरजिल्हाध्यक्ष जमनूदास पुरस्वानी, आमदार कुमार आयलानी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांची झोप उडाली.
टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या ३०७ च्या गुन्ह्यात रोशन झा याला उच्च न्यायालयाने शर्तीचा अटीवर जामीन मिळाला होता. टिटवाळा पोलीस याबाबत कारवाई करणार असल्याचे संकेत उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फुलपगारे यांनी दिली. तसेच सोशल मीडियावर भाजप पदाधिकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झळकलेला फोटो गुंड रोशन झा याचा असल्याची माहिती पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे. व्हायरल झालेला फोटो गुंड रोशन झा याचा आहे का? आदींची खात्री करण्यासाठी भाजप शहाराध्यक्ष जमनूदास पुरस्वानी यांच्या सोबत संपर्क केला असता झाला नाही. त्यानंतर आमदार कुमार आयलानी यांच्याशी संपर्क साधला असता फोटो व्हायरल झालेला फोटो गुंड रोशन झा याचा नसून शहर भाजप सोशल मीडिया प्रमुख रोशन झा याचा असल्याची माहिती आयलानी यांनी दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या दुजोऱ्याने आमदार आयलानी तोंडघशी पडण्याची शक्यता आहे.
कलानी राजला टक्कर देण्यासाठी भाजपची रणनीती?
शहरातील कलानी राजला धक्का देण्यासाठी भाजपनेही सुविख्यात गुंडांना आश्रय देण्याचे काम सुरु केल्याची चर्चा शहरात रंगली आहे. आमदार आयलानी हे रोशन झा बाबत तोंडघशी पडणार असल्याचे बोललेले जात आहे.