पूर्वांचलचे अंतरंग उलगडले छायाचित्रांतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 11:49 PM2019-02-01T23:49:06+5:302019-02-01T23:49:12+5:30
आनंद बालभवनमध्ये उद्यापर्यंत प्रदर्शन पाहता येणार
डोंबिवली :सेव्हन सिस्टर म्हणून सर्वांना परिचित असलेल्या ईशान्य भारताची ओळख सर्वसामान्यांना व्हावी, या हेतूने तेथील जीवनमान, विकास, पर्यटनाची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन विविसू डेहरा आणि डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवारतर्फे पूर्वेतील रामनगरमधील आनंद बालभवनमध्ये भरवण्यात आले आहे.
‘ओळख ईशान्य भारताची, पूर्वांचलचे अंतरंग’ या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन रविवार, ३ फेबु्रवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे. ईशान्य भारतातील नागरिकांना राष्ट्रीय स्रोतामध्ये सन्मानाचे अढळ स्थान मिळवून देणे, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. डोंबिवलीपाठोपाठ ठाणे, मुंबई, विलेपार्ले याठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
डोंबिवलीतील नागालॅण्ड वसतिगृहाचे विद्यार्थी या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या प्रदर्शनात पूर्वांचलातील सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल, नागालॅण्ड, त्रिपुरा, मणिपूर व मिझोराममधील अंदाजे ६५ छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनादरम्यान पूर्वांचलातील आरोग्य आणि शिक्षण याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दिली जात आहे. कुणाल सुतावणे म्हणाले, पूर्वांचलात बोलीभाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. तेथील नागरिकांना हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान देऊन आपल्यात सामावून घेण्याची गरज आहे.
बोगीबिल पूल, डबलडेकर ब्रिजचे छायाचित्र ठरतेय आकर्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या आशिया खंडातील दुसºया आणि भारतातील पहिल्या ४.९ किलोमीटर लांबीच्या बोगीबिल पुलाचे छायाचित्र तसेच तेथील सांस्कृतिक वैभवांची छायाचित्रे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
आर्किड पार्क, सिलचार येथे ११ महिलांनी बंगाली भाषेसाठी बलिदान दिले, त्यांचे छायाचित्र, आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवरील पूल, मेघालयातील अत्यंत स्वच्छ पाणी असलेली दावकी नदी, चेरापुंजी येथील डबल डेकर ब्रिज, अरुणाचल प्रदेशातील अनेकांना माहीत नसलेले मराठा ग्राउंडवरील शिवाजी महाराजांचे स्मारक यांची छायाचित्रे यात पाहायला मिळतील.
नागालॅण्ड येथील घरे, मणिपूर येथील नृत्य आणि मिझारोम येथील पोलो नृत्य, तेथील जेवणाची थाळी, लोकटक तलाव, त्रिपुरा येथील जगन्नाथ मंदिर, अगर झाड, उणीकुटी हिल येथील शिल्पे, सिक्कीम येथील गणेश मंदिर, सैनिकांची माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.