ठाण्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट : युती-आघाडीसह मनसेत सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:36 AM2019-10-05T01:36:22+5:302019-10-05T01:36:33+5:30
शहरातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या चारही मतदारसंघांचे गणित अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले.
ठाणे : शहरातील ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मुंब्रा-कळवा या चारही मतदारसंघांचे गणित अर्ज दाखल झाल्यानंतर स्पष्ट झाले. ठाणे शहरात भाजप विरुद्ध मनसे आणि राष्टÑवादी, मुंब्रा-कळवामध्ये राष्टÑवादी विरुद्ध शिवसेना, कोपरी पाचपाखाडीमध्ये पालकमंत्री विरुद्ध काँग्रेस आणि मनसे, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा संजय केळकर यांच्यावर विश्वास दाखविला आहे. तर, राष्टÑवादीकडून सुहास देसाई आणि मनसेकडून अविनाश जाधव हे आता निवडणूक रिंगणात आले आहेत. त्यामुळे खरी लढत आता या तिघांमध्ये होणार आहे. शिवसेनेची काही मंडळी जरी केळकर यांच्यासोबत असली, तरी काहींची नाराजी अजूनही कायम आहे. तसेच भाजपमधीलदेखील काही इच्छुक हे विरोधात काम करतील, अशी धाकधूक आहे. त्यामुळे याचा फायदा मनसे की राष्टÑवादीला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे या मतदारसंघात कांटें की टक्कर होणार की एकतर्फी, हे पाहणे महत्त्वाचे
ठरणार आहे.
ओवळा-माजिवडात शिवसेना विरूद्ध काँग्रेस सामना रंगणार
ओवळा-माजिवडा मतदारसंघातून स्वकीयांचा विरोध पचवून शिवसेनेकडून प्रताप सरनाईक हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्वकीयांची नाराजी दूर झाल्याचा दावा ते करीत असले, तरी धाकधूक अद्यापही कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, तर मनसेकडूनही वर्तकनगरातील संदीप पाचंगे यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी चव्हाण आणि पाचंगे यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले. लोकसभा निवडणूक न लढल्यामुळे मनसे या ठिकाणी तितकासा प्रभाव टाकेल, असे सध्या तरी चित्र नाही. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणे अपेक्षित आहे.
कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्याविरोधात काँग्रेसने सुरुवातीला हिरालाल भोईर यांचे नाव अंतिम केले होते. मात्र, त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने अखेर शिंदे यांचे विरोधक समजले जाणारे संजय घाडीगावकर यांनाच गळ घालून त्यांना काँग्रेसने तिकीट दिले. या मतदारसंघात क्लस्टर मुद्दा येत्या काळात चांगलाच गाजणार असल्याचे चित्र आहे.
मुंब्रा-कळवा मतदारसंघाच्या बाबतीतही अशीच काहीशी परिस्थिती दिसून आली होती. शिवसेनेकडे इच्छुकांची भाऊगर्दी असतानाही त्यांच्यावर विश्वास न ठेवता अखेरच्या क्षणी दीपाली सय्यद या मराठी अभिनेत्रीला शिवसेनेने उमेदवारी दिली. राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे.