तुरुंगातील भ्रष्ट व्यवस्थेचे चित्र; जेलच्या भिंतींपलीकडी डिक्शनरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 11:36 PM2019-10-26T23:36:18+5:302019-10-27T06:32:18+5:30
ठाण्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी व नेते रमेश कदम यांना अलीकडेच घोडबंदर रोडवरील एका मित्राच्या फ्लॅटमधून रोख रकमेसह पोलिसांनी रंगेहात अटक केली
पंकज रोडेकर
ठाण्यातील तुरुंगात शिक्षा भोगत असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी व नेते रमेश कदम यांना अलीकडेच घोडबंदर रोडवरील एका मित्राच्या फ्लॅटमधून रोख रकमेसह पोलिसांनी रंगेहात अटक केली. वैद्यकीय तपासणीच्या निमित्ताने मुंबईत गेलेल्या कदम यांना पोलिसांनी घोडबंदर रोड येथे नेले. या घटनेच्या निमित्ताने तुरुंगातील भ्रष्टाचार, कैद्यांना बेकायदा दिल्या जाणाऱ्या सुविधा अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह सुरू झाला आहे. तुरुंगातील भ्रष्ट व्यवस्थेचे जाणकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मांडलेले चित्र.
अनेक चित्रपटांमध्ये जेल, जेलर, कैदी पाहिले होते. गब्बरसिंग को बीस साल रोक सके इतनी मजबूत किसी भी जेल की, दिवारे नही वगैरे डायलॉगबाजी ऐकली होती. या जेलमध्ये कधी जावे लागेल, अशी कल्पनाही केली नव्हती. एका गुन्ह्यात अडकल्याने जेलवारी करण्याची पाळी आली आणि आतील भीषण परिस्थिती पाहिल्यावर नाझी छळछावण्या कशा असतील, याचे चित्र डोळ््यासमोर उभे राहिले. जेलमध्ये कच्चे कैदी म्हणून आलेली माणसे आहेत की, पशू असा प्रश्न पडावा इतकी वाईट स्थिती अनुभवास आली.
तुरुंगातील एका बरॅकमध्ये ५० कैदी व्यवस्थित राहू शकतील, या दृष्टीने व्यवस्था केली आहे. मात्र त्या छोट्या बरॅकमध्ये २५० कैदी कोंबलेले आहेत. दिवसा कैदी इकडेतिकडे फिरत असतात. रात्री कसोटी असते. एका कुशीवर प्रत्येकाला झोपावे लागते. गर्दी, उकाडा, उग्र दर्प यामुळे गाढ झोप लागणे कठीण असले तरी समजा एखादा डोळ््यावर झापड असताना इकडे तिकडे सरकला आणि त्याचा शेजारच्या कैद्याला धक्का लागला तर लागलीच तो उठून पेकाटात लाथ घालतो. बुक्के लगावतो. मग बरॅकमध्ये गोंगाट होतो. बरॅकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात ते झोपमोड झाल्यामुळे आणखी मारहाण करतात. तोच प्रकार शौचालयात असतो. तेथे एखाद्या नव्या कैद्याला उशिर झाला तर त्याला मार खावा लागतो. जेलमध्ये पैसे मोजल्याखेरीज झोपायला बºयापैकी जागा मिळत नाही. उशी व अंगावर चादर हवी असेल तर त्याकरिता वेगळे पैसे मोजावे लागतात. १५ हजार रुपये मोजल्यावर पाच लाद्यांवर दोन माणसांना झोपायची जागा मिळते. ज्याची झोपण्याकरिता पैसे मोजण्याची क्षमता नसते अशा कैद्याला शौचालयाच्या बाहेर किंवा जवळपास झोपायची जागा दिली जाते. तेथील दुर्गंधी असह्य असते. क्षणभरही माणूस तेथे उभा राहू शकत नाही. झोप लागणे तर फार दूरची गोष्ट झाली. नवीन कैद्यालाही बरेचदा असे शौचालयाच्या बाहेर सुरुवातीचे दोन-तीन दिवस झोपवले जाते. यामुळे तो जेरीस येतो आणि तुरुंगातील भ्रष्ट व्यवस्थेला शरण येण्याकरिता गुडघ्यावर बसतो.
जेलमध्ये कैद्यांचे ग्रुप तयार झालेले असतात. त्याला ‘हंडी’ म्हटले जाते. या हंडीत समावेश करुन घेण्याकरिता दरमहा चार-पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. हंडीमध्ये एकदा प्रवेश झाला की, तुरुंगातील खडतर आयुष्य काही अंशी समाधानकारक होते. तुरुंगात कैद्यांना दोन रोटी, थोडा भात, डाळ व भाजी असे बेचव जेवण दिले जाते. मात्र हंडीत समावेश झाल्यावर जेवणात बाहेरील पदार्थ मिळतात. फरसाण, मिरची वगैरे खाद्यपदार्थ उपलब्ध होतात.
अशी आहे जेल डिक्शनरी
तुरुंगातील पोलिसाला ‘बाबा’, अशी हाक मारली जाते. आतमध्ये येणारे व दिले जाणाºया पैशांना ‘गांधी’ म्हटले जाते. पैशांचा व्यवहार ठरल्यावर कागदावर लिखापढी केल्यास त्याला ‘चेक’ बोलण्याची पद्धत आहे. जेलमध्ये मोबाइल हवा असल्यास ‘कौव्वा’ हा कोडवर्ड आहे. नशेच्या गोळ्यांना ‘बटण’ संबोधले जाते.
हंडीत किमान दहा व त्यापेक्षा जास्त लोक असतात. त्यांचे दरमहा जमा होणारे पैसे एकत्र करुन हंडीतील सदस्यांची जेवल्यानंतर खरकटी भांडी धुणे, बरॅकमधील कचरा काढणे, कपडे धुणे ही कामे करणाºया अत्यंत गरीब कैद्यांना पैसे दिले जातात. हंडीतील कैदी ‘राजा’सारखे जगतात. हे गोरगरीब कैदी हंडीतील कैद्यांचे अंग रगडून देतात. दीर्घकाळ तुरुंगात राहिलेले काही कैदी आपली शारीरिक भूक भागवतात त्याला ‘गाडी’ म्हटले जाते. पैशाकरिता काही गरीब कैदी अशा अनैसर्गिक लैंगिक संबंधाकरिता तयार होतात. अनेक तुरुंगात जामीन मंजूर होऊनही ती रक्कम भरण्याकरिता पुरेसे पैसे नसलेले कैदी सडत आहेत. काहींशी त्यांच्या कुटुंबाने संबंध तोडला असल्याने त्यांना तुरुंगात राहणे अपरिहार्य झाले आहे.
तुरुंगात उन्हाळ्यात, पावसाळ्यात एकमेकाला खेटून झोपल्यामुळे अनेक कैद्यांना गजकर्ण व तत्सम त्वचारोग झालेले आहेत. लैंगिक संबंध वरचेवर करणाऱ्यांना लैंगिक आजार झाले आहेत. तुरुंगात कैद्यांना आंघोळ करण्याकरिता पुरेशा पाण्याची सोय नाही. एका टाकीत भरून ठेवलेल्या पाण्यातून आंघोळ करावी लागते.
जेलच्या वरच्या मजल्यांवर नामचीन गुंड, आर्थिक घोटाळ्यातील बडे आरोपी, धनदांडगे हंड्या करून राहतात. नामचीन गुंडांच्या बरॅकमध्ये आपल्याला राहायची संधी मिळावी याकरिता त्यांच्या बाहेर असलेल्या साथीदारांना आर्थिक गुन्ह्यांतील बडे आरोपी पाच ते दहा लाख रुपये मोजतात. आपल्या लोकांकडे ही रक्कम आल्याचे कळल्यावर मग त्या धनदांडग्यांची कुख्यात गँगस्टर्सच्या बरॅकमध्ये सोय होते. तेथे बिर्यानी-दारूपासून चरस-गांजापर्यंत सर्व सहज उपलब्ध होते. झोपताना फॅन, कुलरची पण व्यवस्था केलेली असते. गँगस्टर्सकडे कौव्वा असल्याने बाहेर संपर्क ठेवणे शक्य होते.
जेलमध्ये एक हजार पाठवले तर ६०० मिळतात
शासकीय नियमानुसार, कैद्याला दरमहा ३५०० हजार रुपये टपालाद्वारे मागवता येतात. त्याची रिसीट त्याला मिळते. या रकमेतील ३००० रुपये जेल कॅन्टीनमध्ये भरले तर २००० रुपयांचेच सामान मिळते. मात्र जेलमध्ये फाईव्हस्टार हॉटेलसारखे चैनीत राहायचे असेल तर दरमहा हजारो रुपये लागतात. ही रक्कम आत पोहोचवण्याची यंत्रणा प्रत्येक जेलबाहेर उभी राहिलेली आहे. एखाद्या जेलबाहेरील चहावाला किंवा वडापाववाला अथवा भंगारवाला हा पैसे पोहोचवणारा एजंट असतो. त्याच्याकडे कैद्याच्या नातलगांनी एक हजार रुपये आत पाठवण्याकरिता दिले तर नव्या कैद्यापर्यंत ६०० रुपये पोहोचतात. कैदी दीर्घकाळ जेलमध्ये असेल व दरमहा मोठ्या रकमा आत मागवत असेल तर एक हजार रुपयातील ८०० रुपये पोहोचतात. तो एजंट असलेला चहावाला किंवा भंगारवाला एक हजार रुपयातील १०० रुपये काढून घेतो. उर्वरित ३०० रुपये बॅरिकेट इन्चार्जपासून अन्य कर्मचारी काढून घेतात. तुरुंगातील जेवण वाढणारा बत्ता याला खूष ठेवावे लागते. त्याकरिता कैदी स्वखुशीने टीप देतात. जास्त टीप देणाऱ्याच्या पानावर जास्त भाजी पडते किंवा पळी खोलवर घालून तो वाटीत डाळ वाढतो. हंडीतील सदस्यांना वेगवेगळे बाहेरील पदार्थ पुरवण्याचे काम हा बत्ता करतो.
वैद्यकीय तपासणीकरिता ६० हजार ते एक लाख
एखादा बडा राजकीय नेता, गँगस्टर किंवा मालदार कैदी अचानक छातीत, पोटात दुखू लागल्याची तक्रार करतो. मग त्याला वैद्यकीय तपासणीला पाठवले जाते. ही तपासणी हा देखावा असतो. जर कैद्याला स्थानिक सिव्हील हॉस्पीटलमध्ये जाऊन तपासणी करायची असेल तर १५ ते २५ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र जर तपासणी मुंबई किंवा दूरच्या शहरात करायची असेल तर ६० हजार ते एक लाख मोजावे लागतात. वैद्यकीय तपासणी हा केवळ बहाणा असतो. यानिमित्ताने जेलच्या बाहेर येता येते. यावेळी हॉस्पीटलमध्ये जाऊन केवळ जुजबी तपासणी केली जाते. मात्र त्यानंतर हा कैदी एखाद्या फ्लॅटवर किंवा हॉटेलमध्ये जातो. तेथे तो कुटुंबासमवेत दीड-दोन तास काढतो. काहीजण आपल्या धंद्याशी संबंधित भेटीगाठी, बैठका करतात. त्यानंतर पुन्हा जेलमध्ये जातात. यावेळी सोबत पोलीस पार्टी घेऊन जाण्याकरिता संबंधित पोलीस ठाण्याला नियमानुसार पैसे भरावे लागतात. त्याखेरीज पोलीस पार्टीवर वेगळे २० ते २५ हजार खर्च करावे लागतात. खाण्यापिण्याचा खर्च वेगळा होतो.
तुरुंगातील वस्तूंचे दरपत्रक
(वेगवेगळ््या तुरुंगात वेगवेगळे दर असून कैद्याची आर्थिक स्थिती पाहून दर
आकारले जातात)
दोन कांदे, दोन टॉमेटो व मिरची : ५०० रुपये
सिगारेट पाकीट : ५०० रुपये
अंडे : १०० रुपये
पाण्याची बाटली : १०० रुपये
नशेची गोळी : १००० रुपये
गांजा : १५०० रुपये
ठाणे मध्यवर्ती कारागृह
कैदी ठेवण्याची क्षमता
1105
प्रत्यक्ष असलेले कैदी
3850
क्षमतेपेक्षा जास्त कैदी
348%
आधारवाडी जेल
कैदी ठेवण्याची क्षमता 540
प्रत्यक्ष असलेले कैदी 1859
क्षमतेपेक्षा जास्त कैदी 344%