चुलत्याच्या मृतदेहाचे तुकडे सॅकमधून नेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:38 AM2019-11-21T00:38:52+5:302019-11-21T00:38:59+5:30
पुतण्यासह पाच आरोपींना अटक; जादूटोण्याने वडिलांची हत्या केल्याचा होता संशय
ठाणे : आपल्याच चुलत्याने तीन वर्षांपूर्वी जादूटोणा केल्यानेच वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयातून मित्रांच्या मदतीने विष्णू किसन नागरे (४५, रा. दहिसर गाव, ठाणे) या चुलत्याची निर्घृण हत्या करणाऱ्या अमित प्रल्हाद नागरे (१९) याच्यासह पाच जणांना डायघर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी बुधवारी दिली. खुनाचा संशय येऊ नये, म्हणून अमितने हत्येनंतर मृतदेहाचे शिर धडावेगळे करून एका बॅगेत भरले. ते मोटारसायकलवरून नेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचेही तपासात उघड झाले.
अमित आणि अमर शर्मा या दोघांना हत्येनंतर अवघ्या २४ तासांमध्येच पोलिसांनी अटक केली होती. त्यापाठोपाठ यातील निहाल हांडोरे, अविनाश वानखेडे आणि शुभम ढबाले ऊर्फ दाद्या अशा पाच जणांना अटक करण्यात आली. पिंपरी गावातील डोंगरपायथ्याजवळ १५ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पाऊलवाटेच्या बाजूला विष्णू यांचे शिर नसलेले धड पोलिसांना मिळाले होते. त्याची ओळख पटू नये म्हणून मुंडके अन्यत्र फेकून दिल्याने याप्रकरणी खून आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा डायघर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. एकीकडे हे धड कोणाचे याचा तपास सुरू असतानाच कुसुम नागरे यांनी त्यांचे पती विष्णू हे १४ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर कपडे आणि शिर नसलेला मृतदेह, अंगठ्या, हातातील दोरे आदींमुळे कुसुम यांना पतीच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, अशोक भंडारे, कृपाली बोरसे आणि उपनिरीक्षक शिंदे आदींचे पथक तयार करून सुमारे ५० जणांची चौकशी करण्यात आली. तांत्रिक तपास तसेच घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यांच्या आधारे विष्णू यांचा पुतण्या अमित याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या सखोल चौकशीमध्ये काका विष्णू याने जादूटोणा करून वडिलांना २०१६ मध्ये मारल्याचा समज झाल्याने निहाल, अविनाश, शुभम आणि अमर या साथीदारांच्या मदतीने चुलते विष्णू यांचा खून केल्याची कबुली त्याने दिली. सुरुवातीला अमितला १५ नोव्हेंबर रोजी रात्री अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अमर याला १६ नोव्हेंबर रोजी अटक झाली. त्यापाठोपाठ निहाल, अविनाश आणि शुभम या तिघांना इगतपुरी (नाशिक) येथून १७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
काकाच्या खुनासाठी आखला पार्टीचा बेत
विष्णू नागरे या चुलत्यानेच आपल्या वडिलांना जादूटोणा करून मारल्याचा संशय अमितला होता. (मुळात, यकृताच्या आजारामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.) पण संशयाने पछाडल्यामुळे त्याने चुलत्याला संपविण्यासाठी पार्टीचा बेत आखला. ठरलेल्या ठिकाणी आधीच हत्यारे लपवून ठेवून त्याठिकाणी त्याच्या साथीदारांनी दारू आणि इतर साहित्याचीही जमवाजमव केली.
नंतर चुलते विष्णू यांना अमित आणि अविनाश यांनी मोटारसायकलने पार्टीसाठी रात्री ८ वाजता आणले. विष्णू यांनी अति मद्यसेवन केल्यानंतर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आला. नंतर शिर धडावेगळे करून शिर त्याच्याच सॅकमध्ये भरले. ते दिवा डम्पिंग ग्राउंडवर टाकून दिले.
त्यांचा मोबाइल आणि चांदीचे ब्रेसलेट स्वत:जवळ ठेवून ते निघून गेले. तपास पथकाने अमितसह अन्य आरोपींचा कौशल्यपूर्ण तपास अल्पावधीमध्ये करून त्याचे मुंडके दिवा येथून हस्तगत केले. मोबाइल, बे्रसलेट, हत्यारे, मोटारसायकल आणि रक्ताने माखलेले कपडेही जप्त केल्याचे उपायुक्त बुरसे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.