ठाण्यात शिरताना जरा जपून; प्रवेशालाच धोका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2018 09:35 AM2018-08-06T09:35:29+5:302018-08-06T09:36:50+5:30
प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत
ठाणे: शहराचं प्रवेशद्वारच धोकादायक स्थितीत असल्यानं वाहन चालकांवर जीव मुठीत धरुन प्रवास करण्याची वेळ आली आहे. याशिवाय पादचाऱ्यांच्या जीवालादेखील धोका निर्माण झाला आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील ठाणे महापालिकेच्या प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत आहे. याआधी अनेकदा कमानीचं प्लास्टर कोसळण्याच्या घटना घडूनही अद्याप ठाणे महापालिकेला जाग आलेली नाही.
लाल बहादूर शास्त्री मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आहे. मात्र या प्रवेशद्वाराची सध्या दुरवस्था झाली आहे. प्लास्टरचे तुकडे खाली पडत असल्यानं या भागातून जाणाऱ्या वाहनांना आणि पादचाऱ्यांना धोका आहे. गेल्याच आठवड्यात ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील यांनी याबद्दल ठाणे महापालिकेला पत्र लिहिलं. महापौर मिनाक्षी शिंदे या प्रकरणात लक्ष घालून तातडीनं प्रवेशद्वाराची दुरुस्ती करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. 'छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कधीही कोसळू शकतो. या प्रवेशद्वाराच्या दुरुस्तीसाठी मी ठाण्याच्या महापौरांना पत्र लिहिलं आहे,' असं पाटील यांनी सांगितलं.
दहा दिवसांपूर्वी कमानीचं प्लास्टर पडून एका कारची काच फुटली, अशी माहिती प्रवेशद्वाराजवळ कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी दिली. मात्र कार चालकानं कोणतीही तक्रार दाखल केली नाही, असंही त्यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेकडे याबद्दलची तक्रार पोहोचल्यावर शनिवारी महापौर मिनाक्षी शिंदेंनी प्रवेशद्वाराची पाहणी केली. 'प्रवेशद्वाराच्या कमानीचा काही भाग कोसळण्याच्या स्थितीत असल्याची माहिती खरी आहे. कमानीचं प्लास्टर कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. आम्ही लवकरच कमानीची दुरुस्ती करु,' असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.