दफनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडपल्याचा आरोप, प्रताप सरनाईकांविरोधात जनहित याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 07:26 AM2022-09-30T07:26:03+5:302022-09-30T07:26:20+5:30
ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च येथील रहिवाशांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.
बहुमजली इमारत बांधण्यासाठी शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे दफनभूमीसाठी राखीव असलेला ३७,००० चौरस मीटर भूखंड हडपल्याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च येथील रहिवाशांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. ठाण्यात ख्रिश्चन समाजासाठी दफनभूमी जागा अपुरी असल्याचे याचिकेत म्हटले आहे. ठाणे महापालिकेने दोन विकास आराखड्यांत शहरासाठी १० भूखंड राखीव ठेवले होते. मात्र, एकही भूखंड हस्तांतरित केलेला नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
भायंदर पाडा येथे जीबी रोड जेथे प्रस्तावित मेट्रो स्टेशन उभारण्यात येणार आहे, तिथे दफनभूमीसाठी भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. या भूखंडाची सद्य:स्थिती पाहण्यासाठी याचिकाकर्ते गेले असता, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ कंपनीजच्या बहुमजली इमारतीसाठी संबंधित भूखंड अनारक्षित केल्याचे समजले.
प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने भूखंड अनारक्षित केल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. न्यायालयाने सरनाईक यांच्या कंपनीला प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली.