येशूबाळाची पालखी साधूंच्या खांद्यावर
By admin | Published: December 28, 2015 01:58 AM2015-12-28T01:58:56+5:302015-12-28T01:58:56+5:30
एका हिंदु मंदिरातून येशूबाळाची पालखीतून निघालेली मिरवणूक. पालखी हिंदू महंताच्या खांद्यावर. तर टाळ-मृदुंग आणि ढोलकीच्या तालावर हरिनाम आणि रामनामाचा अभंगाच्या गजरात
शशी करपे, वसई
एका हिंदु मंदिरातून येशूबाळाची पालखीतून निघालेली मिरवणूक. पालखी हिंदू महंताच्या खांद्यावर. तर टाळ-मृदुंग आणि ढोलकीच्या तालावर हरिनाम आणि रामनामाचा अभंगाच्या गजरात पालखी थेट ख्रिश्चन संस्थेत पोचते. पालखी सोहळ्यात विविध धर्मींचा सहभाग, असे अनोखे सर्वधर्मीय एकतेचे दर्शन घडवणारे दृश्य उमेळे गावात पहावयास मिळाले.
नाताळनिमित्ताने वसईत निरनिराळया धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात रेलचेल सुरु आहे. पण, उमेळे गावात अभंग भवन संस्थेचे फादर मायकल जी आणि सिंथिया बॅप्टिस्टा यांनी नाताळनिमित्ताने आगळ्यावेगळ्या सर्वधर्मीय नाताळ मेळाव्याचे आयोजन केले होते.
उमेळा गावदेवी साकाई माता मंदिरा-तून येशूबाळाची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. उमेळा महिला भजन मंडळी आणि पाचूबंदर गोपाळकृष्ण भजन मंडळीने ढोलकीच्या तालावर हिंदू भजने म्हटली. गिरीधर आश्रमातील भगव्या वेषातल्या महंतांनी पालखी खांद्यावर घेऊन ती ख्रिश्चन संस्था असलेल्या अभंग भवनापर्यंत आणली. दयामाता मंडळ व रमेदी चर्च यांनी नाताळ गीते ऐकवून स्वागत केले. गायिका सुविद्या पाटोळे यांनी येशूची गाणी ऐकवली. निष्कलंक चर्चच्या गायकवृंदाने कॅरलमध्ये ख्रिस्ती प्रार्थना म्हटली. मौलाना शेख यांनी ख्रिस्त जन्मकथा कथन केली. त्यानंतर झालेल्या सर्वधर्मीम मेळाव्यात आशिष शिंदे, सिस्टर सुमा, स्वामी महाराज, मौलाना एजाज अहमद शेख, रॉबर्ट फर्नांडीस, हेमंत राऊत आदी मान्यवर हजर होते.