मंगळागौर मंडळांचा पिंगा गं पोरी पिंगा
By admin | Published: July 14, 2016 01:47 AM2016-07-14T01:47:26+5:302016-07-14T01:47:26+5:30
श्रावण महिना सुरू व्हायला १५ दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी श्रावणात मंगळागौरचे खेळ सादर करणाऱ्या मंडळांच्या तालमी मात्र महिनाभरापूर्वीपासूनच सुरू झाल्या आहेत.
स्नेहा पावसकर, ठाणे
श्रावण महिना सुरू व्हायला १५ दिवसांचा अवधी शिल्लक असला तरी श्रावणात मंगळागौरचे खेळ सादर करणाऱ्या मंडळांच्या तालमी मात्र महिनाभरापूर्वीपासूनच सुरू झाल्या आहेत. मंगळागौर खेळणारी ठाण्यात काही मोजकीच महिला मंडळे असली तरी विशेष म्हणजे ही मंडळे श्रावणासाठी आतापासूनच बुक झाली आहेत. गेल्या काही वर्षांत विविध राजकीय पक्षांसह मोठ्या संस्थांच्या मागणीमुळे या खेळाला इव्हेंटचे स्वरूप येऊ लागले आहे.
परंपरेनुसार चालत आलेला मंगळागौरीचा कार्यक्रम, त्यातील खेळ, त्याचे महत्त्व हे हल्लीच्या ग्लोबल आणि धकाधकीच्या आयुष्यात काळाआड होणार, अशी ओरड ज्येष्ठ वर्गाकडून ऐकायला मिळत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत तरुण नोकरदार महिलाही मंगळागौर खेळणाऱ्या मंडळांत उत्साहाने सामील होत आहेत. यंदाही जून महिन्यापासूनच ठाण्यातील महिला मंडळांनी तालमींना सुरुवात केली आहे. श्रावण सुरू व्हायला १५ दिवस शिल्लक राहिले असल्याने तालमींना वेग आला आहे. झिम्मा, फुगडी, लाटण्यांचा खेळ, गाठोडं, होडी, पिंगा या पारंपरिक खेळांसोबतच यंदा डेक्कन क्वीन, सासर-माहेर अशा नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. बदलत्या काळानुसार पूजाअर्चेपेक्षा तरुणी मोबाइलवर चॅटिंगमध्ये दंग दिसतात. यावरच, संवादात्मक रूपात सासर-माहेर हा खेळ दिसणार आहे.
श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी एका मंडळाला साधारण ३ ठिकाणी कार्यक्रमांचे निमंत्रण असते. ही मंडळे एका कार्यक्रमासाठी सुमारे १० ते १५ हजार मानधन स्वीकारतात. प्रत्येक मंडळात साधारण १५-२० महिला असून त्यांच्या प्रवासाचा, खेळ सादर करताना लागणाऱ्या वस्तूंचा, खानपानाचा खर्च मानधनातून भागवला जातो.
बदलत्या काळानुसार आता मंगळागौरीलाही हौसमौजेचं रूप येऊ लागले आहे. कामावरून दमूनभागून आल्यावरही या महिला रात्री एकमेकींच्या घरी खेळांचा सराव करतात. त्यानिमित्ताने कधी गप्पा रंगतात, तर कधी मिष्टान्न भोजनाचेही बेत आखले जातात. हे बदलते स्वरूप नवविवाहित वधूंनाही आवडत असल्याने त्यांचेही या मंडळांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती मेधा आघारकर यांनी दिली.