डोंबिवलीतील गुलाबी रस्त्यामुळे अधिकाऱ्यांचे चेहरे पडले पांढरेफटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 02:30 AM2020-02-07T02:30:11+5:302020-02-07T02:30:54+5:30

जगण्याकरिता मरण पोसताय का, अधिकाऱ्यांना केला सवाल

The pink road in Dombivli caused the officers to face a white light | डोंबिवलीतील गुलाबी रस्त्यामुळे अधिकाऱ्यांचे चेहरे पडले पांढरेफटक

डोंबिवलीतील गुलाबी रस्त्यामुळे अधिकाऱ्यांचे चेहरे पडले पांढरेफटक

Next

- मुरलीधर भवार 

कल्याण : कधी हिरवा पाऊस तर गेले दोन दिवस गुलाबी रस्ता, यामुळे माध्यमांमध्ये गाजत असलेल्या डोंबिवलीतील प्रदूषणाची पाहणी करण्याकरिता अचानक हजेरी लावण्याचे फर्मान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले आणि सरकारी यंत्रणेतील सर्व संबंधित अधिकाºयांचे चेहरे पांढरेफटक पडले. डोंबिवलीतील हा रस्ता गुलाबी नाहीच, हे भासवण्याकरिता मग यंत्रणा कामाला लागली.

रस्त्यावर माती पसर, गुलाबी रंगाचे रसायन रस्त्यावर येणारा स्रोत शोधून तो थांबवण्याचा प्रयत्न कर, असे सर्व सोपस्कार सरकारी यंत्रणेने केले. मात्र, त्यांच्या केविलवाण्या प्रयत्नांना यश आले नाही. एरव्ही, डोंबिवलीकरांना भेडसावणाºया प्रदूषणाकडे कानाडोळा करणाºया या अधिकाºयांना गुरुवारी ठाकरे यांनी फैलावर घेतल्याने डोंबिवलीचे जावई असलेल्या मुख्यमंत्र्यांवर डोंबिवलीकर खूश झाले.

डोंबिवलीतील प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाल्याच्या बातम्या गेले दोन दिवस टीव्ही, सोशल मीडियावर दिसत असल्याने ठाण्यात वेगवेगळ्या भूमिपूजन समारंभांकरिता आलेल्या मुख्यमंत्र्यांनी अचानक डोंबिवलीत पाहणी करण्याकरिता जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली. प्रदूषण झाकण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर सुरू केल्या. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याची पाहणी करून यंत्रणांना चांगलेच फैलावर घेतले. जगण्यासाठी मरण पोसताय का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्र्यांनी अधिकाºयांना केला तेव्हा त्यांचे चेहरे उतरले.

डोंबिवली फेज नंबर-२ मध्ये रासायनिक कारखाने आहेत. या रासायनिक कारखान्यांतून होत असलेल्या प्रदूषणामुळे सिमेंटचा रस्ता गुलाबी झाला. गेले सुमारे चार दिवस या ‘गुलाबी’ रस्त्यावरून डोंबिवलीकर वाटचाल करीत आहेत. दोन दिवस हा रस्ता चर्चेत आला. खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी गुलाबी रस्त्याची पाहणी केली. खा. शिंदे यांनी पाहणी करण्यापूर्वी रस्त्यावरील गुलाबी रंग टँकरच्या पाण्याचा फवारा मारून धुऊन काढण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला गेला.

गुरुवारी मुख्यमंत्री येणार असल्याने ज्या नाल्यातून गुलाबी रंगाचा पाट वाहत होता, त्याठिकाणी कामगार हेल्मेट, गमबूट आणि हातमोजे घालून चक्क नाल्यात उतरवले. प्रदूषित सांडपाणी बाहेर काढण्यासाठी पंप लावण्यात आला. तसेच काही ठिकाणी खराब रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करण्यात येत होते. काही ठिकाणी रासायनिक गाळ जेसीबीच्या साहाय्याने काढण्याची धांदल सुरू होती.
मुख्यमंत्री येणार हे कळताच मनसेचे आ. राजू पाटील यांनी तिकडे भेट दिली. तसेच पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रवींद्रन यांनी मुख्यमंत्र्यांच्या आधीच येऊन सुरू असलेल्या रंगसफेदीची पाहणी केली.

घटनास्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. या परिसरातील कॅन्टीन, हॉटेल बंद करण्याची तंबी पोलिसांनी दिली. दुपारी २ वाजता परिसर निर्मनुष्य करण्यात आला. आसपासच्या कारखान्यांतील कामगार उत्सुकतेपोटी बाहेर येऊन इतका पोलीस बंदोबस्त कशासाठी, अशी विचारणा करीत होते. मुख्यमंत्री गुलाबी रस्ता पाहायला येत आहेत, हे कळल्यावर हसत कपाळावर हात मारून घेत होते. एका कामगाराने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी याठिकाणी खोदकाम करीत असताना हा गुलाबी रंग रस्त्यावर आला. त्यानंतर, हा रस्ता गुलाबी झाला.

मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत असलेले अधिकारी, पत्रकार, बघे यांना आजूबाजूच्या प्रदूषणाचा उग्र वास सहन होत नसल्याने त्यांनी तोंडावर रूमाल घेतले होते. अचानक शिवसैनिक मोठ्या संख्येने जमल्याने आता मुख्यमंत्री येणार, हे स्पष्ट झाले. लागलीच डोंबिवली निवासी भागातील प्रदूषणाने त्रस्त असलेले नागरिक, कारखानदार व ‘कामा’ या कारखानदारांच्या संघटनेचे पदाधिकारी जमले. नागरिक व कारखानदार यांच्यात तेथेच प्रदूषणावरून वादंग सुरू झाला. हा वादंग वाढला तर मुख्यमंत्र्यांपुढे शोभा होईल, हे पाहून पोलिसांनी नागरिक व कारखानामालक यांना घटनास्थळापासून दूर जाण्यास सांगितले.

कारखानदार व नागरिक यांना मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यायचे होते. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखले. ज्या कारखान्यातून हा गुलाबी रंग नाल्यात वाहत आहे, तो कारखाना २५ वर्षांपूर्वी बंद झाला आहे. त्याच्या मालकाने तो कारखाना दुसºयाला विकला आहे. एमआयडीसीकडून ड्रेनेज लावून टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. जेसीबीने खोदकाम करीत असताना ड्रेनेजचे चेंबर फुटले. त्यामुळे गाळासह गुलाबी रंगाचे रासायनिक सांडपाणी रस्त्यावर आले. ही लंगडी सबब एमआयडीसीकडून मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जागरूक नागरिक व माहिती कार्यकर्त्यांनी रस्ता गुलाबी झाल्याच्या घटनेचा बाऊ केला आहे, असे कारखानदार सांगत होते व मुख्यमंत्र्यांनी येऊन दखल घ्यावी, इतकी ही मोठी घटना नाही, असे बोलत होते.

नागरिकांच्या मते मुख्यमंत्री हे शिवसेनापक्षप्रमुख असल्यापासून डोंबिवलीच्या प्रदूषणाकडे लक्ष ठेवून आहेत. आता तर ते मुख्यमंत्री असल्याने प्रदूषण दूर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. अचानक शिट्या वाजू लागल्या... पोलिसांनी काठ्यांनी लोकांना मागे रेटले... मुख्यमंत्री रस्त्यावर उतरले... अधिकारी त्यांना माहिती देत होते... मुख्यमंत्री प्रश्न करीत होते, जाब विचारत होते... काही मिनिटांत ही भेट संपली. गुलाबी रस्त्यावर पांगापांग झाली.
 

डोंबिवलीत हवा प्रदूषण करणारे ९१ कारखाने आहेत. रासायनिक प्रक्रिया करण्याकरिता सध्या वापरल्या जाणाºया इंधनाऐवजी सीएनजीचा वापर करावा, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुचविण्यात आले आहे. डोंबिवलीतील धोकादायक व अतिधोकादायक रासायनिक कारखान्यांचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल 22तारखेपर्यंत द्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

अतिधोकादायक कारखाने अंबरनाथला ज्या ठिकाणी नागरी वस्ती नाही, त्याठिकाणी हलविण्याचा विचार केला जावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रोबेस कंपनीचा स्फोट व आगीच्या घटना पाहता, कारखान्यांच्या सेफ्टीसंदर्भातील थर्ड पार्टी आॅडिट करणे आवश्यक असल्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकारीवर्गास दिले.प्रदूषणाने त्रस्त असलेल्या नागरिकांच्या असहायतेचा किती गैरफायदा घेणार, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Web Title: The pink road in Dombivli caused the officers to face a white light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.