आदिवासी धोडदे पाड्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:47 AM2021-03-01T04:47:19+5:302021-03-01T04:47:19+5:30
वज्रेश्वरी : तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी गणेशपुरीजवळील आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोडदे पाडा या आदिवासी वस्तीतील पिण्याच्या पाण्यासाठी दररोज होणारी ...
वज्रेश्वरी : तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी गणेशपुरीजवळील आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोडदे पाडा या आदिवासी वस्तीतील पिण्याच्या पाण्यासाठी दररोज होणारी १ किलोमीटरची पायपीट येथील जाणीव प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने लायन्स क्लब नॉर्थ बॉम्बे यांच्या माध्यमातून नळपाणी योजना राबवून थांबवली आहे. तसेच विविध विकास योजना राबवून या पाड्याचे रूप पालटवले आहे.
साधारण चारशे लोकवस्ती असलेल्या धोडदे पाडा येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी येथे असलेल्या एकमेव विहिरीवर अवलंबून राहावे लागत हाेते. दरवर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून ही विहीर आटल्यावर येथील महिलांना पाण्यासाठी १ किलोमीटर पायपीट करावी लागत हाेती. महिलांची ही समस्या जाणीव प्रतिष्ठानचे भूपेंद्र शहा आणि उमेश महाडिक यांना समजल्यावर त्यांनी लागलीच लायन्स क्लब ऑफ नॉर्थ बॉम्बे यांच्या पदाधिकाऱ्यांना पाण्याची ही समस्या लक्षात आणून दिली. लायन्स क्लबने चार लाख रुपये खर्च करून या पाड्यासाठी बोअरवेल मारून देऊन स्वतंत्र नळपाणी योजना राबवली आणि प्रत्येक घराच्या दारापर्यंत पाणी उपलब्ध करून देऊन या महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवली आहे. या सर्व उपक्रमात लायन्स क्लब ऑफ बॉम्बेचे गव्हर्नर, सदस्या रेश्मा कुकरेजा, सदस्य गोलिया, गर्ग आणि इतर सर्व सदस्यांनी विशेष योगदान दिले.
शाळेचीही दुरुस्ती
जाणीव प्रतिष्ठानने लायन्स क्लबच्या माध्यमातून येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला लादी बसवण्यात येऊन गळके पत्रे बदलवून शाळेची आकर्षक रंगरंगोटी करून देऊन शाळेचे चित्र पालटवून टाकले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दोन संगणक आणि दोन प्रिंटरही देण्यात येऊन संगणकाचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकाची व्यवस्था करून दिली, तर गावात रात्री उजेडासाठी १० स्ट्रीटलाइट लावून दिले. या नळपाणी योजनेच्या उद्घाटनावेळी पाड्यातील ग्रामस्थांना ३० हजार रुपयांचे फळझाडे आणि फुलझाडे यांचे वाटप करण्यात आले.