भिवंडीत पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त; दोघांना अटक
By नितीन पंडित | Published: November 2, 2022 03:38 PM2022-11-02T15:38:11+5:302022-11-02T15:38:58+5:30
दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून एक पिस्टल व पाच जिवंत कडतुस जप्त करण्यात यश मिळविले.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: भिवंडी पोलोस परिमंडळ क्षेत्रात जबरी चोरी चैन स्नाचिंग मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढीस लागल्याने पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना नाकाबंदी करून गस्ती वाढविण्याच्या सक्त सूचना दिल्यानंतर शांतीनगर पोलिसांनी गस्ती दरम्यान दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून एक पिस्टल व पाच जिवंत कडतुस जप्त करण्यात यश मिळविले असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी बुधवारी दिली आहे.
शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव व पोलिस पथकातील तुषार वडे व किरण मोहिते हे टेमघर पाईपलाईन या भागात गस्त घालीत असताना पोलीस हवालदार तुषार वडे यांना दोन संशयित व्यक्ती गावठी बनावटीची पिस्टल व काडतुस सोबत बाळगुन भादवड नाका ते सोनाळे या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पिस्टलचा धाक दाखवुन त्यांचे कडील सोनसाखळी, पैसे व मोबाईल फोन जबरीने चोरत आहेत व येणाऱ्या भिवंडी महानगरपालिका निवडणुकी दरम्यान घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने कोणास तरी त्या पिस्टलने जीवे मारणेची सुपारी घेतली आहे अशी माहिती गुप्त बातमीदाराने दिली.
त्यानुसार तात्काळ प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना फोनव्दारे याची माहिती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने लक्ष्मण म्हात्रे चौक भादवड गांव भिवंडी येथुन सापळा लावुन आशिष आदित्यनाथ श्रीवास्तव वय ३६, रा.रांजणोली नाका, भिवंडी मुळगांव राऊतपार, जिल्हा संत कबीरनगर, उत्तरप्रदेश व शुभम विरेंद्र मिश्रा वय २५, रा.भादवड गांव भिवंडी मुळगांव भौसोली जिल्हा जौनपुर उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून पिस्टल व पाच जिवंत काडतुसे व गुन्ह्यासाठी वापरली जाणारी दुचाकी असा ८२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.यापैकी आरोपी आशिष आदित्यनाथ श्रीवास्तव हा सराईत गुन्हेगार असून त्याविरोधात पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाणे येथे घरफोडी चोरीच्या दोन गुन्ह्यांची नोंद आहे.तर तो भिवंडी येथे टाटा स्काय डिश लावण्याचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"