व्यावसायिक स्पर्धेतून फास्ट फूडमध्ये ठेवले पिस्तूल, मीरा-भाईंदर गुन्हे शाखेने दोघांना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:42 PM2024-04-01T12:42:42+5:302024-04-01T12:43:00+5:30
Mira-Bhyander Crime News: काशिमीरामध्ये हॉटेल-फास्ट फूडसाठी लागणाऱ्या काउंटरपासून फर्निचर आदींच्या व्यवसायातील रोषातून तीन व्यावसायिकांकडे शस्त्रे ठेवण्याचे कारस्थान करणाऱ्या दोघांना मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बेड्या ठोकल्या.
मीरा रोड - काशिमीरामध्ये हॉटेल-फास्ट फूडसाठी लागणाऱ्या काउंटरपासून फर्निचर आदींच्या व्यवसायातील रोषातून तीन व्यावसायिकांकडे शस्त्रे ठेवण्याचे कारस्थान करणाऱ्या दोघांना मीरा-भाईंदर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने बेड्या ठोकल्या. या कारवाईत दोन पिस्तुले, तर आरोपींकडून २ पिस्तुले व जिवंत राऊंड पोलिसांनी जप्त केले. ही पिस्तुले प्रतिस्पर्धी व्यावसायिकांच्या सामानात ठेवून त्यांनासुद्धा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या प्रयत्नात होते, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मीरा गावठाण महाविष्णू मंदिरशेजारी बिंदा फास्ट फूड आहे. या फास्टफूड चालकांनी भाईंदर पूर्व उड्डाणपुलाजवळ मुन्ना ऊर्फ अनिस खान या व्यावसायिकाकडून फूड काउंटर शुक्रवारी रात्री खरेदी केले होते. त्यातील कप्प्यात शस्त्रे सापडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळेंसह उपनिरीक्षक शिवाजी खाडे व अन्य अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून दीड लाख रुपये किमतीची मेड इन यूएसए लिहिलेली पिस्तूले, ८० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व ४३ जिवंत काडतुसांचे राउंड असा २ लाख ४५ हजार रुपये किमतीचा शस्त्रसाठा जप्त केला. शनिवारी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार
शस्त्र सापडल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर गुन्हे शाखा-१ चे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी मुन्ना यांच्याकडे चौकशी केली. पोलिसांनी तपास चालवला असता मुन्नासह अन्य दोघा व्यावसायिकांना शस्त्रांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी व्यावसायिक प्रतिस्पर्धी फिरोज याने हा कट रचला होता, असे समोर आले. पोलिसांनी फिरोज व शाकीर या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत. शाकीर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे.