डोंबिवलीत सात जणांनी तरुणावर रोखले पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:54 AM2018-05-15T03:54:12+5:302018-05-15T03:54:12+5:30
रागाने बघितल्याच्या वादातून सात जणांनी एका तरुणावर पिस्तूल रोखल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास सागर्ली गावात घडली.
डोंबिवली : रागाने बघितल्याच्या वादातून सात जणांनी एका तरुणावर पिस्तूल रोखल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास सागर्ली गावात घडली. मात्र, जमलेल्या लोकांनी आरडाओरड केल्याने या सर्वांनी तेथून पळ काढला. त्यामुळे तरुणाचा जीव वाचला. याप्रकरणी सात जणांविरोधात टिळकनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
एकमेकांकडे रागाने बघितल्यामुळे राहुल पाटील (२९, रा. सागर्ली गाव) आणि अर्जुन कदम, विपुल शेट्टी व लिच्या यांच्यात वादविवाद झाला होता. त्या रागातून अर्जुन, विपुल आणि लिच्या हे चार साथीदारांसह पाटील राहत असलेल्या इमारतीजवळ आले. यावेळी पाटील लग्नाच्या वरातीतून आपल्या घरी मित्रासाठी पाणी आणण्यासाठी जात होता. त्यावेळी ‘त्याला मारा, खल्लास करा,’ असे अर्जुनने सांगत पाटील याच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटीलच्या एका मित्राने तलवार रोखली. त्यावेळी विपुल, लिच्या यांच्यासह चार जणांनी तलवारी, लाकडी दांडके, हॉकीस्टीक घेऊन पाटील याला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी मारेकऱ्यांपैकी एकाने पाटील याच्यावर पिस्तूल रोखले. जमावाने आरडाओरडा केल्याने हे मारेकरी मोटार तेथेच टाकून पसार झाले. याप्रकरणी पाटील याने टिळकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करत आहेत.