कल्याणमध्ये खड्ड्याचा बळी; पत्रीपुलावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:22 AM2019-08-10T02:22:35+5:302019-08-10T02:23:44+5:30
ट्रकची रिक्षा आणि दोन दुचाकींना धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू , तर अन्य एक जखमी
कल्याण : पत्रीपुलावर होणारी प्रचंड कोंडी आणि खड्डे आता चालकांच्या जीवावर बेतू लागला आहे. शुक्रवारी सकाळी पूर्वेकडून पत्रीपूलमार्गे पश्चिमेला जाणाऱ्या एका ट्रकने रिक्षा आणि दोन दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार अरुण महाजन यांचा मृत्यू झाला, तर विलास रेडकर हे अन्य दुचाकीचालक जखमी झाल्याची घटना घडली आहे. खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक बनल्याने तो नोव्हेंबरमध्ये पाडण्यात आला. तेव्हापासून शेजारी केडीएमसीने बांधलेल्या पुलावरून दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पत्रीपुलावर सातत्याने प्रचंड वाहतूककोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागत आहे. तसेच, खड्डे चुकवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून हेच खड्डे शुक्रवारी महाजन यांच्या जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे.
पत्रीपुलावरून पश्चिमेकडे जाणाºया ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने रहेजा कॉम्प्लेक्ससमोर रोडवर एका रिक्षासह दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघातात महाजन यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेडक र हे जखमी झाले. यात रिक्षाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पत्रीपुलावरून पश्चिमेकडे येताना रस्त्याला उतार असून खड्डे असल्याने दुचाकीस्वारांनी ते वाचवण्यासाठी वेग कमी केला आणि त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वेगातील ट्रकची धडक बसल्याचा आरोप होत आहे. जखमी रेडकर यांनीही खड्डे चुकवताना अपघात झाल्याचा आरोप आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले महाजन हे पश्चिमेतील बेतुरकरपाडा येथे वास्तव्याला होते. ते डोंबिवली एमआयडीसीतील खाजगी कंपनीत कामाला होते. रात्रपाळी करून सकाळी दुचाकीवरून ते घरी परतत होते. त्यावेळी गाडीला अपघात होऊन त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर रेडकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांच्या हाताला चार टाके पडले आहेत. रेडकर हे डोंबिवलीतील एमआयडीसी विभागात राहतात. अपघातास कारणीभूत असलेला ट्रकचालक नदीम शेख याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.
पुलाचे काम कधी मार्गी लागणार?
ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडल्यानंतर नवीन पुलाच्या कामाचे डिसेंबर २०१८ मध्ये भूमिपूजन करण्यात आले. नवीन पुलाचे काम आठ महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. परंतु, आजघडीला सात महिने उलटूनही काम संथगतीनेच सुरू आहे. मागील वर्षी कल्याणमधील खड्ड्यांनी पाच जणांचा बळी घेतला होता. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतर तरी संबंधित विभागाला जाग येते का, याकडे लक्ष लागले आहे.