‘पितांबरी’ची आग शॉर्टसर्किटमुळे
By admin | Published: February 21, 2017 03:51 AM2017-02-21T03:51:35+5:302017-02-21T03:51:35+5:30
भिवंडी तालुक्यातील सुपे-अनगाव येथील पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.च्या अगरबत्तीनिर्मिती कारखान्याला रविवारी लागलेली
ठाणे : भिवंडी तालुक्यातील सुपे-अनगाव येथील पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.च्या अगरबत्तीनिर्मिती कारखान्याला रविवारी लागलेली आग विद्युतपुरवठ्यातील शॉर्टसर्किट व हवेतील तापमानवाढ या दोन्ही कारणांमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज कंपनीने वर्तवला आहे.
आगीसाठी कुणावरही संशय नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कंपनीने आगप्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध केली असून साप्ताहिक सुटी असल्याने व अग्निशामक दलाचे बंब वेळेवर पोहोचू न शकल्याने आग वेळेत आटोक्यात आणणे शक्य झाले नाही, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
प्रभुदेसाई म्हणतात की, आगीच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, अगरबत्तीच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य, कार्यालयीन कागदपत्रे व संगणक यंत्रणा पूर्णपणे भस्मसात झाली आहे. आगीमुळे झालेले नुकसान साधारणत: एक ते दीड कोटीच्या घरात जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. याच ठिकाणी पितांबरीच्या फूडकेअर डिव्हिजनचा कारखाना, पितांबरी टिश्यू कल्चरसाठी उभारण्यात आलेले ग्रीनहाउस, गोशाळा आदी उपक्रम चालतात. परंतु, यापैकी कशाचेही आगीमुळे नुकसान झालेले नाही. आगीचे वृत्त समजताच पितांबरीचे संचालक व अॅग्रीकेअर आणि अगरबत्ती डिव्हिजनचे व्हाइस प्रेसिडेंट परीक्षित प्रभुदेसाई व चीफ मार्केटिंग आॅफिसर माधव पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्यात सहभाग घेतला. येत्या एक ते दोन महिन्यांत कारखाना पूर्ववत सुरू करण्यात येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)