खड्डे अन् मेट्रोचे काम भिवंडीकरांसाठी ठरतेय डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:38 AM2021-08-29T04:38:12+5:302021-08-29T04:38:12+5:30
भिवंडी : भिवंडी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत ...
भिवंडी : भिवंडी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. तर यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीची समस्यादेखील बिकट झाली आहे. त्यातच एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या शहरात सुरू असून, मेट्रोच्या ठेकेदाराने रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी पत्रे लावले आहेत. यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत,
वास्तविक पाहता मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यापूर्वी शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणे मनपा व एमएमआरडीए प्राधिकरणाने हटविणे आवश्यक होती. मात्र, रस्त्यावरील अतिक्रमणे ताीच ठेवून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू केल्याने शहरातील अंजुरफाटा ते धामणकर नाका या दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर सध्या प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्यातच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने ते बुजविण्यासाठी भिवंडी मनपा प्रशासनाबरोबरच एमएमआरडीए अथवा मेट्रो प्रकल्प ठेकेदाराचे पुरते दुर्लक्ष झाल्याने खड्डे व मेट्रो प्रकल्पाचे काम भिवंडी शहरवासीयांची डोकेदुखी ठरत आहे. मनपा प्रशासन केवळ खड्ड्यांमध्ये खडी टाकून बुजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, पावसामुळे ही खडी बाजूला झाल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच होत आहे.