खड्डे, धुळधाणीमुळे वाहनचालक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:58 AM2020-10-10T00:58:56+5:302020-10-10T00:59:01+5:30
खडीकरणाचा उतारा ठरतोय निरुपयोगी
डोंबिवली : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांपाठोपाठ आता त्यातील उडणाऱ्या धुळीमुळे सध्या नागरिक चांगलेच बेजार झाले आहेत. पावसाने उघडीप दिल्याने केडीएमसीने डांबराचे पॅच मारण्यास सुरुवात केली असली, तरी काही महत्त्वाचे रस्ते अजूनही खड्ड्यांतच आहेत. दरम्यान, या खड्ड्यांतील खडी इतरत्र पसरल्याने त्रासात अधिकच भर पडत आहे.
शहरातील मुख्य रस्ते व चौकांची खड्ड्यांमुळे दयनीय स्थिती झाली आहे. सध्या डांबरीकरणाची कामे सुरू झाली असली, तरी त्याला वेग आलेला नाही. त्यामुळे बहुतांश रस्ते आजही खड्ड्यांतच आहेत. मनसेने खड्ड्यांच्या मुद्यावर १ आॅक्टोबरला केडीएमसीच्या वर्धापनदिनी अभिनव आंदोलन केले होते. ज्या टिळक रोडवर आंदोलन झाले, तेथेही आज डांबर पडलेले नाही. दुसरीकडे ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्याचीही खड्ड्यांनी पुरती चाळण केली आहे.
या रस्त्याच्या एका मार्गिकेवर अमृत योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्यात येत आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाकडून ही कामे संथगतीने सुरू असल्याने अनेक महिने ही मार्गिका वाहनांसाठी बंदच आहे.
एमआयडीसीच्या निवासी भागातही खड्डे कायम असून, तेथील मुख्य रस्ते खड्ड्यांत गेल्याने धुळीच्या त्रासाने रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. खड्ड्यांमध्ये टाकलेली खडी इतरत्र पसरल्याने त्यावरून वाहने नेताना वाहनचालकांची विशेषकरून दुचाकीचालकांची तारेवरची कसरत सुरू असल्याचे दिसून येते. दरम्यान, खड्डे व धुळीतून मुक्तता होणार कधी, असा सवाल केला जात आहे.
...तर विभागीय कार्यालयावर मोर्चा काढू - काकडे
डोंबिवलीतील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा २० आॅक्टोबरला केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन रिक्षाचालक-मालक युनियनने दिला आहे.
पूर्व-पश्चिमेतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, वाहने खड्ड्यांत आदळत आहेत. रिक्षाचालकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याकडे युनियनचे अध्यक्ष रामा काकडे यांनी लक्ष वेधले आहे. रस्ते दुरुस्तीसंदर्भात त्यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे.