विसर्जन मार्गावर खड्ड्यांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:51 AM2017-09-01T00:51:00+5:302017-09-01T00:51:14+5:30
मीरा-भार्इंदरमध्ये यंदा दीड व पाच दिवसांच्या एकूण ८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले अशी माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दिली.
भार्इंदर : मीरा-भार्इंदरमध्ये यंदा दीड व पाच दिवसांच्या एकूण ८ हजार गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले अशी माहिती आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी दिली. अनंत चतुर्थीला विसर्जनावेळी सार्वजनिक मंडळाच्या मिरवणूका निघतील. परंतु,
मुसळधार पावसाने रस्त्याच्या दर्जाची पोलखोल केल्याने अनेक विजर्सन मार्गांवर खड्डयांची आरास निर्माण झाली आहे.
काँक्रीटचे काही रस्ते ऐन पावसाच्या तोंडावर घाईघाईने उरकण्यात आल्याने काही ठिकाणी रस्त्यांना पावसातच तडे गेल्याने ते डांबराने झाकण्यात आले आहेत. तर अर्धवट काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे. या डांबरी रस्त्यांसह पावसाळ्यापूर्वी नव्याने डांबरीकरण केलेले रस्ते उखडले आहेत. यामुळे रस्ते दुरूस्तीवरील निधी वाया गेला आहे.
रस्त्यावर पडलेल्या खड्यांत खडी टाकून ते झाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
मंगळवारी पडलेल्या अतिवृष्टीने शहरातील सर्व डांबरी रस्ते धुवून गेले असून त्यातील बहुतांश रस्त्यांवरुन विसर्जनाच्या मिरवणुका काढल्या जातात. विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे पालिकेने त्वरीत भरावेत, रस्ते सपाट करावेत अशी मागणी गणेशभक्तांकडून होऊ लागली आहे.
प्रशासनाने इंद्रलोककडे जाणाºया रस्त्याचा काही भाग काँक्रीटचा केला असला तरी उर्वरित रस्ते डांबरी आहेत. या रस्त्यांवर खड्डे पडले असून ते त्वरित बुजवण्यात यावेत. खड्यांमुळे उंच मूर्तींचा अपघात होण्याची शक्यता असून असे प्रकार दोनवेळा घडले आहेत. ते टाळण्यासाठी प्रशासनाने अनंत चतुर्थीपूर्वी खड्डे भरावेत. - शंकर विरकर, मंडळाचे सल्लागार
सतत कोसळणाºया पावसामुळे खड्डे भरण्यात अडथळा निर्माण होत असला तरी तात्पुरते खड्डे भरण्यासाठी त्यात खडी टाकून ते बुजवण्याचे आदेश अधिकाºयांना दिले आहेत. पाऊस थांबल्यानंतरच रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात येणार आहे. खड्डे अनंत चतुर्थीपूर्वी भरण्याचा प्रयत्न करू.
- डॉ. नरेश गीते, पालिका आयुक्त