एमआयडीसी परिसरात खड्डे ‘जैसे थे’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:11 AM2020-08-09T00:11:51+5:302020-08-09T00:11:53+5:30

निवासी भागातील रहिवासी हैराण; पाणी साचल्याने डबक्यांतून काढावी लागतेय वाट

Pits in MIDC area 'as they were'! | एमआयडीसी परिसरात खड्डे ‘जैसे थे’!

एमआयडीसी परिसरात खड्डे ‘जैसे थे’!

Next

डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र सलग पाचव्या वर्षीही पाहायला मिळत आहे. या भागातील चार रस्त्यांच्या डागडुजीसाठी एमआयडीसीने पुढाकार घेतला होता, परंतु आता ते रस्तेही खड्ड्यांत गेले आहेत. उर्वरित रस्त्यांचीदेखील हीच अवस्था असल्याने पावसाच्या पाण्याचाही निचरा योग्य प्रकारे होत नसल्याने पाण्याच्या डबक्यांमधून रहिवाशांना वाट काढावी लागत आहे.

केडीएमसी हद्दीत १ जून २०१५ ला २७ गावांचा समावेश झाला. परंतु, या गावांमध्ये येणाऱ्या एमआयडीसी निवासी भागातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अद्यापही भीषण आहे. त्यातच पावसाच्या पाण्याचाही योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. डबक्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्डे किती खोलवर आहेत, हे कळत नाही. त्यामुळे दुचाकी खड्ड्यांत आपटून अपघातही घडत आहेत. एकूणच अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. गेल्यावर्षी पावसाळ्यानंतरही खड्डे कायम राहिल्याने खड्ड्यांतून वाहने जाऊन खडीची माती होऊन उन्हाळ्यात धुळीचा त्रासही येथील रहिवाशांना सहन करावा लागला.

खड्डे व अन्य नागरी सुविधांच्या बोजवाºयासंदर्भात निवासी भागातील महिलांनी उपोषणाचाही इशारा दिला होता. त्यावर केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे टप्प्याटप्प्याने सुरू करून अन्य सुविधांच्या बाबतीतही ठोस उपाययोजना करू, असे आश्वासन दिले होते. परंतु, आजही अंतर्गत रस्त्यांवर खड्डे कायम आहेत.

चार रस्त्यांची झाली होती डागडुजी
मागील वर्षीच्या एप्रिलमध्ये एमआयडीसीने सर्व्हिस रोड, मॉडेल कॉलेज परिसरातील भाजीगल्ली, गणपती मंदिरासमोरील रोड, मिलापनगर तलाव रोड, या चार रस्त्यांची डागडुजी केली होती.
एमआयडीसी परिसरात अन्य प्राधिकरणांनी केलेल्या खोदकामांच्या बदल्यात वसूल केलेल्या पैशांतून या रस्त्यांची कामे मार्गी लावण्यात आली होती.
सध्या सर्व्हिस रोड, ज्येष्ठ नागरिक मंडळासमोरील रोड, एम्स रुग्णालय रोड, टिळकनगर महाविद्यालय रोड ते साई सृष्टी सोसायटी रोड, ममता हॉस्पिटल रोड, मॉडेल कॉलेज रोड, मिलापनगर, ओमकार स्कूल रोड आदी परिसरांतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.

Web Title: Pits in MIDC area 'as they were'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.