महापालिकेसह, एमएसआरडीसी अन् एमएमआरडीच्या रस्त्यांवर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:50+5:302021-07-22T04:24:50+5:30
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने ठाणे महापालिकेसह एमएसआरडीसी आणि एमएमआरडीच्या रस्त्यांची चाळण केल्याचे चित्र सध्या ठाण्यात ...
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने ठाणे महापालिकेसह एमएसआरडीसी आणि एमएमआरडीच्या रस्त्यांची चाळण केल्याचे चित्र सध्या ठाण्यात दिसत आहे. साकेत, घोडबंदर रोड, शहरातील इतर रस्त्यांसह महापालिकेने तयार केलेल्या उड्डाणपुलांवरदेखील खड्डे असल्याने वाहतुकीचा मार्गही खडतर झाला आहे. पाऊस अन् त्यात रस्त्यांवरील खड्डे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यातही पावसाळ्यापूर्वी या तिन्ही यंत्रणांकडून रस्त्यांवर मुलामा लावला होता. परंतु, पावसाने त्यांचा हा तात्पुरता मुलामा पुरता धुवून काढला आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी आता महापालिका प्रशासन पावसाला थांबण्याचीच विनंती करत असल्याचे सांगत असून तो जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत खड्डे बुजविणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेसह इतर दोनही यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी त्यांच्या हद्दीतील रस्ते, उड्डाणपूल डांबर किंवा मास्किट अस्फाल्ट पद्धतीने तयार करून घेतले होते. या तंत्रज्ञानामुळे रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, असा दावा या तिन्ही यंत्रणांनी केला होता. परंतु, पावसाळा सुरू होताच तो फोल ठरला आहे. घोडबंदर रोडवर तर उड्डाणपूल आणि खालील बाजूसही खड्डेच खड्डे असे चित्र आहे. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहतुकीचा वेग हा मंदावल्याचेच दिसत आहे. उड्डाणपुलांवर तर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या उड्डाणपुलांवरील रस्त्याची दुरुस्तीदेखील पावसाळ्यापूर्वी केली होती. परंतु, अवघ्या दीड महिन्यात यावर खड्डे पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याशिवाय एमएसआरडीने उभारलेल्या माजिवडा, कापूरबावडी आदी उड्डाणपुलांवर खड्डेच खड्डे आहेत. तिकडे महापालिकेच्या मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलावरदेखील खड्डेच खड्डे आहेत. खड्ड्यांचा आकार एवढा आहे की, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहन चालकांना येथून जाताना अगदी सावकाश जावे लागत आहे. पाऊस असल्याने त्यांचा अंदाज बांधता येत नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
तिकडे साकेत मार्गावरदेखील खड्डे असल्याने रोजच्या रोज येथे वाहतूककोंडी होत आहे. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी असलेल्या सर्व्हिस रस्त्यावरदेखील खड्डे पडले आहेत. एकूणच शहराच्या विविध भागात खड्डेच खड्डे झाले असून, ते भरण्यासाठी आता पावसाने उसंत घ्यावी, विनंती महापालिका पावसाला करीत आहे.