खड्ड्यांनी वाढवली मॅरेथॉन स्पर्धकांची चिंता; सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचा मात्र कानाडोळा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 12:27 AM2019-08-18T00:27:24+5:302019-08-18T00:28:13+5:30
ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या ३० व्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास २२ हजार स्पर्धक सज्ज झाले आहेत. यंदा ते स्मार्ट सिटी मॅरेथॉन या घोषवाक्याखाली धावणार आहेत.
ठाणे : ठाणे महापालिकेने आयोजित केलेल्या ३० व्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेसाठी जवळपास २२ हजार स्पर्धक सज्ज झाले आहेत. यंदा ते स्मार्ट सिटी मॅरेथॉन या घोषवाक्याखाली धावणार आहेत. परंतु, या स्मार्ट सिटीत असलेल्या खड्ड्यांनी त्यांची चिंता मात्र वाढवली आहे. त्याचे कारणही तसेच आहे, काही वर्षांपूर्वी एका स्पर्धकाचा याच खड्ड्यांमुळे पहिला क्रमांक हुकला होता, त्यामुळे आता तशी वेळ पुन्हा त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, याची तमा न करता सारे काही आलबेल असल्याचे सांगून सत्ताधारी शिवसेनेसह प्रशासनाने याकडे वेड्याचे सोंग घेऊन कानाडोळा केला आहे.
रविवारी सकाळी ६ वाजता विविध अकरा गटांत तीघेण्यात येणार आहे. यंदा प्रथमच महिलांचीदेखील २१ किमीची स्पर्धा प्रमुख आकर्षण असणार आहे. यंदाही स्पर्धेत टाइम टेक्नॉलॉजीचा वापर २१ किमी पुरुष आणि १५ किमी महिलांच्या गटासाठी करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण २२१ पंच, ९२ पायलट, २१० सुरक्षारक्षक, शेकडो स्वयंसेवक आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी मेहनत घेत आहेत.स्पर्धेसाठी महापालिकेने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या असून त्यामध्ये स्पर्धकांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन सेवापथके, तत्काळ वैद्यकीय सेवा, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिकांसह रु ग्णवाहिका, स्पर्धेच्या मार्गांवर विविध टप्प्यांवर प्राथमिक उपचारकेंद्रे असणार आहेत. याशिवाय, स्पर्धकांसाठी ठाणे परिवहनसेवेचीमोफत बससेवेची सुविधा उपलब्ध केली आहे.
गेल्याकाही दिवसांपासून मॅरेथॉनच्या मार्गांवरील खड्डे बुजविण्याच्या मोहिमेला वेगही आला आहे. परंतु वारंवार कोसळत असलेल्या पावसाने ते पुन्हा उखडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच खड्डे हाच मोठा अडथळा या स्पर्धेसाठी निर्माण झाला आहे. काही ठिकाणी सिमेंट तर काही ठिकाणी डांबर टाकून तात्पुरत्या स्वरूपात मुलामा मारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, अधूनमधून जोरदार बरसणाºया सरींमुळे या मार्गावर पुन्हा खड्डे दिसत आहेत. शिवाय, मॅरेथॉनचा शेवट ज्या ठिकाणी होणार आहे, त्याठिकाणीसुद्धा पालिकेने एक दिवस रस्ता बंद ठेवून तेथील खड्डे बुजविले होते. परंतु, पावसाने पुन्हा या रस्त्याची चाळण केली आहे. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी याच खड्ड्यांमुळे एका स्पर्धकाचा पहिला क्रमांक हुकला होता.