ठाकुर्ली उड्डाणपुलावरील खड्डे भरायला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:40 AM2021-07-31T04:40:28+5:302021-07-31T04:40:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरातील ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने होत असलेल्या वाहतूककोंडीचा फटका वाहनांसह रुग्णवाहिकांनाही बसत होता. याबाबतचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्डे पडल्याने होत असलेल्या वाहतूककोंडीचा फटका वाहनांसह रुग्णवाहिकांनाही बसत होता. याबाबतचे वृत्त लोकमतने शुक्रवारी ‘ठाकुर्ली उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी’ या मथळ्याखाली प्रकाशित करताच केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या वृत्ताची दखल घेत मनपाच्या बांधकाम विभागाने उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली.
पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या नव्या कोपर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, या पुलाच्या कामामुळे वाहतूक दोन वर्षांपासून ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वळवण्यात आली आहे. पावसाच्या सुरुवातीला जूनमध्ये या पुलाच्या ठिकाणी खड्डे पडले होते. ते मनपाकडून बुजविण्यात आले होते. परंतु, नुकत्याच पडलेल्या मुसळधार पावसात पूर्व-पश्चिम भागासह पुलाच्या मध्यभागीही मोठमोठे खड्डे पडले. खड्ड्यांमुळे येथील वाहतूक मंदावल्याने वाहनचालकांना कोंडीला सामोरे जावे लागत होते. वाहनांसह रुग्णवाहिकाही अडकून पडत असल्याने कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांचीही दमछाक होत होती.
दरम्यान, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच मनपाने खडीमिश्रित मुरुमाचा भराव टाकून खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही खडीमिश्रित मुरुम मात्र कितपत टिकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पावसाने उघडीप देताच डांबरीकरणाने खड्डे भरून कायमस्वरूपी दिलासा द्यावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
-------------------