भाईंदरच्या फेरीवाल्यांना मिळणार जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 12:20 AM2020-01-01T00:20:40+5:302020-01-01T00:23:30+5:30
नागरिकांची त्रासातून होणार सुटका, वाहतूककोंडीही फुटणार
मीरा रोड : भाईंदर पश्चिमेला पोलीस ठाण्याजवळ पालिका प्रभाग कार्यालय, नाझरेथ शाळा परिसरात व राम मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर बसणाºया विक्रेत्यांना महापालिका नेहरु व शास्त्रीनगर मधील मोकळी जागा खुल्या मंडईसाठी देणार आहे. त्यासाठीचे नियोजन महापालिकेने केले असून यामुळे नाझरेथ शाळेतील विद्यार्थी - पालकांसह नागरिक व वाहन चालकांची कोंडीतून सुटका होईल अशा विश्वास आयुक्त बालाजी खतगावकर यांनी व्यक्त केला.
या अरूंद रस्त्यावर विक्रेते बसतात. अनेक वर्षांपासून हा बाजार भरत असला तरी गेल्या काही वर्षात विक्रेत्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. हातगाड्या लावणारे वा खाली बसणारे असे विक्रेते आपला व्यवसाय करतात.
भाजी खरेदीसाठी येथे ग्राहकांची गर्दी असते. नागरिकांनाही या भागातून चालताना कसरत करावी लागते. या भागात अवर लेडी आॅफ नाझरेथ ही शाळा आणि कनिष्ठ विद्यालय आहे. शाळा भरायच्या आणि सुटायच्या वेळी येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने गर्दीतून वाट काढताना विद्यार्थ्यांचे हाल होतात. शिवाय पालकांची गर्दी असते ती वेगळीच.
या जटिल समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने विक्रेत्यांना स्थलांतरीत करुन लालबहाद्दूर शास्त्रीनगर व जवाहरलाल नेहरु नगर दरम्यानची असलेली मोकळी जागा मंडईसाठी निश्चीत केली आहे. या ठिकाणी सिमेंटचा कोबा केलेला आहे.
आम्ही स्थानिक ग्रामस्थ असूनही आम्हाला आमचीच गाडी या हातगाड्यांमुळे नेता येत नाही. गाडी बाहेर उभी करावी लागते. गर्दीचा ज्येष्ठ नागरिक, महिला, रुग्ण, लहान मुलांना खूपच त्रास होतो. येथील सर्व फेरीवाल्यांचे जवळपास पुनर्वसन करून आमचा रस्ता मोकळा करा.
- पुनीत पाटील, रहिवाशी
फेरीवाल्यांना मोकळ्या जागेत बसवण्याचा आराखडा पालिकेने तयार केलेला आहे. त्यासाठी विक्रेत्यांशी चर्चा केली जाणार आहे. विक्रेत्यांसह लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन आदींच्या सहकार्याने महापालिका अमलबजावणी करणार आहे.
- बालाजी खतगावकर, आयुक्त