पेपर कटिंग आर्टला ‘लिम्का,’ ‘इंडिया बुक’मध्ये स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:13 AM2019-11-23T00:13:19+5:302019-11-23T00:13:22+5:30
शरद पाटील यांची कलाकृती; डोंबिवलीच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा, मान्यवरांचे केले पोर्ट्रेट
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : शहरातील कलाकार शरद पाटील यांनी ‘पेपर कटिंग आर्ट’ या आगळ्यावेगळ्या कलाकृतीला जन्म दिला. या कलाकृतीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. यापूर्वीही त्यांच्या एका कलेची दखल ‘लिम्का बुक’ने घेतली आहे. पाटील यांच्या यशामुळे डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
डोंबिवलीत जन्मलेल्या पाटील यांचे शालेय शिक्षण पांडुरंग विद्यालयात झाले. चित्रकलेचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसतानाही सातवीत असताना एका आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत ते ठाणे केंद्रातून प्रथम आले होते. काहीतरी वेगळे करण्याच्या भावनेतून त्यांनी चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. परंतु, प्रशिक्षण नसल्याने चित्रे रेखाटायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. नियमित सराव आणि व्हिडीओ पाहून ज्ञानाच्या जोरावर त्यांनी ही कला आत्मसात केली. मान्यवरांची हुबेहूब चित्रे त्यांना साकारता येऊ लागली. त्या-त्या मान्यवरांना त्यांचे रेखाटलेले रेखाचित्र दाखवून ते त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊ लागले. त्यांच्या या छंदाचे रूपांतर एका संग्रहात झाले.
नेते, अभिनेते, गायक, कवी, लेखक, खेळाडू, अशा विविध क्षेत्रांतील ८४५ मान्यवरांची रेखाटलेली रेखाचित्रे व स्वाक्षऱ्या त्यांच्याकडे आहेत. पाटील यांच्या संग्रहातील निवडक १६० चित्रांची निवड लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये २०१९ ला करण्यात आली. पाटील यांचे हे लिम्का बुकमधील पहिले रेकॉर्ड होते. त्यानंतर, त्यांनी वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्यांना पेपर कटिंग आर्ट ही कला सुचली. पेपर कटिंगद्वारे कलाकारांचे हुबेहूब चेहरे तयार करण्याच्या सरावाला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी नटसम्राट नाटकातील अभिनेता मोहन जोशी आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे पोट्रेट तयार केले. त्यावर त्यांनी त्यांच्या स्वाक्षऱ्याही घेतल्या. पहिल्या पोट्रेटनंतर पाटील यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी हॅम्लेट नाटकातील नायक सुमित राघवन यांची कलाकृती तयार केली. यावेळी त्यांची कलाकृती तयार करून त्यांना दाखवत असतानाच मनवा नाईक यांनी माझे पोट्रेट कुठे आहे, असे विचारले. त्यावर पाटील यांनी त्यांना नाटक संपेपर्यंत मिळेल, असे सांगून ते नाट्यगृहाबाहेर गेले. त्यानंतर त्यांनी नाटक संपायच्या आत त्यांचे पोट्रेट पूर्ण करून त्यांची स्वाक्षरी घेतली. त्यांनी आतापर्यंत २७५ हून अधिक मान्यवरांची पेपर कटिंग पोट्रेट तयार करून त्यावर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. या कलाकृती नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी २६८ पोर्ट्रेट, तर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने २७५ पोट्रेट निवडले आहेत.
बिस्ट्स मोझेक पोट्रेट
पाटील सध्या एका नवीन प्रकल्पावर काम करीत आहेत. बिस्ट्स (मणी) मोझेक पोट्रेट यामध्ये रंगीबेरंगी मणी वापरून कलाकृती तयार करीत आहेत.
पाटील यांनी अशोक सराफ यांचे ४९०० मणी आणि प्रशांत दामले यांचे ४५९० मणी वापरून मोझक पोट्रेट तयार केले असून त्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत.
आपल्या कलेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी पाटील यांची इच्छा आहे. हे स्वप्न उराशी बाळगून ते अविरतपणे काम करीत आहेत.