‘ज्ञानतृष्णे’मुळे ग्रंथांचे स्थान अढळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 05:50 AM2018-04-22T05:50:36+5:302018-04-22T05:50:36+5:30
वाचनसंस्कृतीमधील या बदलांचा आढावा घेणारा लेख
२३ एप्रिल हा विल्यम शेक्सपिअर यांचा जन्म दिन व मृत्यू दिन. हाच दिवस जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर एखाद्या सणासारखा आठवडाभर सोहळा साजरा होत असला, तरी भारतात तेवढ्या धूमधडाक्यात हा दिवस साजरा होत नाही. आपल्याकडे ग्रंथांची प्रदीर्घ परंपरा आहे. जोपर्यंत ज्ञानतृष्णा अबाधित आहे, तोपर्यंत एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ग्रंथप्रेम संक्रमित होईल. तंत्रज्ञानामुळे वाचनप्रेम कमी झाले नाही, तर माध्यम केवळ बदलले. वाचनसंस्कृतीमधील या बदलांचा आढावा घेणारा लेख...
स्वत:ला व्यक्त करण्याचे साधन म्हणजे पुस्तक. इतरांना समजून घेण्याचे माध्यम हे देखील पुस्तकच आणि जगाचे ज्ञान घेण्याचे माध्यमदेखील पुस्तकच आहे. काळानुरूप पुस्तकाची रचना, ठेवण बदलत गेली असली, तरी पुस्तकांचे महत्त्व आजही अबाधित आहे. किंबहुना, आधीपेक्षा पुस्तकांचे महत्त्व वाढले आहे. वाचनसंस्कृती लोप पावत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. वाचनसंस्कृती ही प्रगल्भ होत असून वाचनासोबत आता वाचक स्वत:ला व्यक्त करू लागले आहेत. भविष्यात पुस्तके ही ई-लायब्ररीत मिळतील. मात्र, पुस्तकांच्या वाचनाची आवड पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात वाढेल. तंत्रज्ञानातील बदलांमुळे पुस्तके इंटरनेटवर आणि मोबाइलवर सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे भविष्यात पुस्तकांची जागा ई-लायब्ररीत असेल, हे नक्की. पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेणारे तेवढ्याच प्रमाणात वाढणार आहेत.
दि. २३ एप्रिल हा जागतिक ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपिअर यांचा स्मृतिदिन हा २३ एप्रिल आहे. त्यामुळे हा दिवस जगाच्या पाठीवर ग्रंथ दिन म्हणून साजरा केला जातो. जगभरात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. काही देशांत तर आठवडाभर हा सोहळा साजरा होतो. परदेशाच्या तुलनेत भारतात ग्रंथ दिनाला तेवढे महत्त्व दिले जात नाही. स्थानिक पातळीवर काही कार्यक्रम होतात. मात्र, खेड्यापाड्यांत आणि शाळांमध्ये या दिवशी कार्यक्रम होत नाहीत. कार्यक्रम हे एक निमित्त आहे, मात्र त्या निमित्ताने पुस्तकाकडे पाहण्याची दृष्टी लक्षात येते. प्राचीन ग्रीक वाड्.मयात ग्रंथालयांना आत्म्याचे प्रवेशद्वार म्हटले जात होते. स्वत: शेक्सपिअर हे सोळाव्या शतकात कोणत्या गं्रथालयात बसायचे, त्यांचे वाचनवेड, नाटके यांच्यावर हजारो पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांचे घर पर्यटनाचे केंद्र झाले आहे. यानिमित्ताने मराठी वाचकांनी ग्रंथदिनी किमान एकतरी पुस्तक विकत घेऊन ही ग्रंथसंपदा अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कारण, पुस्तक हे जग समजून घेण्याची एक खिडकी आहे.
महाराष्ट्राचा आणि पुस्तकांचा विचार केल्यास महाराष्ट्रात पुस्तकांचे महत्त्व हे सर्वाधिक होते. महाराष्ट्रात समाजसुधारक हेच राजकीय विचारवंत होते. त्यामुळे त्यांचे विचार पुस्तकरूपातून समोर आले. अनेक समाजसुधारकांची ग्रंथसंपदा प्रचंड होती. ज्या काळात महाविद्यालये आणि विद्यापीठे नव्हती, आजच्यासारखी साक्षरता नव्हती, त्या काळात मोठमोठे शिलालेख पाहावयास मिळतात. अठराव्या शतकात ब्रिटिशांच्या आगमनामुळे पुस्तकछपाईमुळे मोठी क्रांती झाली. जॉन गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावल्यावर क्रांती झाली. अठराव्या शतकात मराठीतील पहिले पुस्तक विल्यम कॅरे या लेखकाने बंगाल येथे सेरामपूर येथे १८०५ साली प्रसिद्ध केले. या मराठी पुस्तकाचे नाव ‘द ग्रामर आॅफ मरहट्ट लँग्वेज’ होते. मराठी भाषेच्या व्याकरणावर आधारित हे पुस्तक होते. १८०५ पासून खºया अर्थाने पुस्तकांच्या प्रगतीला सुरुवात झाली.
१८०५ सालापासून १८६७ या कालावधीत जी पुस्तके छापली गेली, त्यांना ‘डोला मुद्रित’ पुस्तके म्हणत होते. त्यानंतर, १८६७ मध्ये पुस्तकावरील कायदा आला. स्वामित्वहक्काचा कायदा आल्यावर जी पुस्तके छापली गेली, त्यांना खºया अर्थाने महत्त्व आले. कोणत्याही पुस्तकाच्या लेखाची कॉपी करता येत नव्हती. त्या काळात हजाराहून अधिक पुस्तके छापली गेली. त्याचवेळेला वर्तमानपत्रांची सुरुवात झाली. बघताबघता लोक सुशिक्षित होण्यास सुुरुवात झाली. लोक सुशिक्षित झाल्यावर पुस्तकांच्या माध्यमातून जगभरातील ज्ञानाची कवाडं खुली झाली.
लोकमान्य टिळक, आगरकर, विनोबा भावे, सावरकर, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात पुस्तकांचे लेखन केले. एवढेच नव्हे तर या नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगात राहून पुस्तके लिहिली. लोकांपर्यंत व्यक्त होण्याचे ते माध्यम होते. समाजपरिवर्तनाच्या चळवळीसोबत देशातील स्वातंत्र्याची क्रांती या पुस्तकांमुळेच झाली. महात्मा गांधींना लढण्याची प्रेरणाही पुस्तक आणि लेखकांमुळे मिळाली. लिओ टॉलस्टॉय व रस्किन बॉण्ड या लेखकांच्या पुस्तकांचे वाचन केल्याने गांधींमध्ये लढण्याची प्रेरणा निर्माण झाली. क्रांती घडवण्याचे काम एखादी व्यक्ती करू शकत नाही, तर ते काम ग्रंथांनी केले आहे. याच काळात खºया अर्थाने ‘ग्रंथसत्ता’ प्रस्थापित झाली. लोकांच्या आचारविचारात बदल झाले. देशात उद्योगाची निर्मिती झाली. काळ बदलला आहे. जागतिकीकरणामुळे घरटी एक माणूस परदेशात आहे. जग जवळ आले आहे. त्यामुळे इंग्रजीचे महत्त्व सर्वसामान्यांनाही कळू लागले आहे. खेड्यापाड्यांत इंग्रजीतून शिक्षण देणाºया शाळा निर्माण झाल्या. मराठी ग्रंथ आणि वृत्तपत्रे यांच्यावर काही बंधने आली आहेत. त्यांना बदलावे लागत आहे. गं्रथांची जागा इतर माध्यमांनी घेतली आहे. आधुनिकीकरणामुळे ग्रंथांची माध्यमे बदलत चालली आहेत. सोशल मीडियावर मत व्यक्त करण्याचे व्यासपीठ तयार झाले आहे. ग्रंथांची जागा ई-बुक घेऊ लागले आहे. ग्रंथालयासाठी लागणारी जागा मोठी होती. आता आधुनिकीकरणामुळे कमी जागेत लाखोंच्या संख्येने ई-बुक साठवणे शक्य आहे. पुस्तकरूपी गं्रथसंपदा सांभाळणे, जतन करणे, हे अवघड काम आहे. भविष्यात नष्ट न होणारे ई-बुक त्यांची जागा घेतील. इलेकट्रॉनिक माध्यमांनी पुस्तकांच्या क्षेत्रात क्रांती केली आहे.
हे बदल घडत असले, तरी वाचनाचे सूत्र कायम राहणार आहे. केवळ माध्यम बदलत जाईल. वाचकांचा ओढा वाढेलच. लेखक वाढत आहेत. अनेक तरुण चित्रपट आणि नाटके लिहीत आहेत. ही वाचनसंस्कृतीसाठी चांगली बाब म्हणावी लागेल. अजून तरी पुस्तक प्रकाशन करणाºया कंपन्यांपैकी कोणी आत्महत्या केलेली नाही. आजही पुस्तक खरेदी करणाºयांची संख्या सर्वाधिक आहे. आधुनिक काळात आमिश पटेल आणि देवदत्त पटनायक या लेखकांना लाखो रुपयांचे मानधन मिळत आहे. हे वाचनसंस्कृती वाढत असल्याचे प्रतीक आहे. प्रत्येक दोन पिढ्यांत एक सूत्र कायम राहणार आहे आणि ते म्हणजे जोपर्यंत ज्ञानतृष्णा अबाधित राहील, तोपर्यंत ग्रंथाचे महत्त्व कायम असेल. केवळ त्याचे स्वरूप काळानुरूप बदलत जाईल.
(शब्दांकन : पंकज पाटील)
श्याम जोशी