जकातनाक्याची जागा डायघर पोलीस स्टेशनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 04:14 AM2018-09-19T04:14:11+5:302018-09-19T04:14:33+5:30
कासारवडवली, कळवा पोलीस ठाणे उभारण्यात ठाणे महापालिकेने यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ठाणे : कासारवडवली, कळवा पोलीस ठाणे उभारण्यात ठाणे महापालिकेने यापूर्वी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर आता कल्याणफाटा येथील जकातनाक्याची इमारत शीळ डायघर पोलीस ठाण्याकरिता देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार यासंदर्भातील प्रस्ताव तयार केला असून भाडेतत्त्वावर ही जागा दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
शीळ डायघर पोलीस ठाण्याची इमारत रस्ता रुंदीकरणात बाधित होणार आहे. त्यामुळे हे पोलीस ठाणे दुसरीकडे स्थलांतरित करणे आवश्यक ठरले आहे. ठाणे पोलिसांनी महापालिकेच्या जकातनाक्याची जागा पोलीस ठाण्याकरिता ताब्यात मिळावी, अशी मागणी केली आहे. या बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ हे ३९४.४७ चौ.मी. एवढे आहे. त्यानुसार मासिक भाडे हे ८६ हजार २४१ अधिक जीएसटी असे आकारले जाणार आहे. त्यानुसार ही वास्तू पाच वर्षांकरिता पोलीस ठाण्याला भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. या वास्तूमध्ये कोणत्याही स्वरूपाचा फेरफार करता येणार नाही, वीज व पाणी यांचे संयोजन स्वतंत्र घ्यावे लागणार आहे.