आयत्यावेळी ठराव बदलून 30 एकरचा भूखंड विकासकाला दिला आंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 03:34 PM2018-10-25T15:34:30+5:302018-10-25T15:34:40+5:30
ठामपाचा चौथा मजला सील करुन चौकशी करा- आनंद परांजपे
ठाणे (प्रतिनिधी)- सुमारे 30 एकरचा आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन त्यावर नागरी सुविधा देणार्या वास्तू उभारण्याचा ठराव आयत्यावेळी बदलून 30 एकरपैकी फक्त 2500 चौ.मीटरच्या भूखंडावर संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करुन उरलेला सुमारे 29.50 एकरचा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधार्यांनी रचला आहे. एकंदर पाहता, ठामपाचा कारभार एमसीएचआयच्या दावणीला बांधण्याचा प्रकार केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेेते मिलींद पाटील यांनी केला. तर, ठामपाचा चौथा मजला अर्थात शहर विकास विभाग बड्या विकासकांच्या गैरकृत्याने भरलेला आहे. त्यामुळे सीबीआयचा एक मजला जसा सील करुन चौकशी करण्यात येत आहे. त्याचपद्धतीने ठामपाचा चौथा मजला सील करुन लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या माध्यमातून मोठ्या बिल्डरच्या मोठ्या गृहसंकुलांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे.
हिरानंदानी इस्टेट येथील 30 एकरच्या आरक्षित भूखंडापैकी केवळ 2500 चौ. मीटरचा भूखंड ताब्यात घेण्याचा ठराव सत्ताधार्यांनी रेटून केला आहे. त्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक सुहास देसाई, ज्येष्ठ नगरसेवक मुकूंद केणी, शानू पठाण आदी उपस्थित होते.
ठाणे महानगर पालिकेच्या परिक्षेत्रातील हिरानंदानी इस्टेट येथे 30 एकरचा भूखंड नागरी कामांसाठी आरक्षित करण्यात आला होता. हा संपूर्ण भूखंड ताब्यात घेण्यासंदर्भात आपण सूचना केली होती. त्यानुसार, प्रकरण क्रमांक 366 नुसार हिरानंदानी इस्टेट येथील सर्व्हे क्र. 278 हा भूखंड ताब्यात घेण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी हा मूळ प्रस्ताव बासनात गुंडाळून सर्व्हे क्र. 278/2,3,4,5 मधील 2500 चौ. मी. जागेत 5 टन क्षमतेच्या बायोमिथेशन व बायोकंम्पोस्टींग प्रकल्पाला संरक्षक भिंत उभारण्याच्या खर्चाच्या मंजुरीचा प्रस्ताव आणून त्या आड उर्वरिति भूखंड बिल्डरसाठी सोडण्याचा डाव रचला असल्याचे उघडकीस आल्याने आपण या प्रस्तावावर सहीच केली नाही. तरीही, सत्ताधार्यांनी नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करून हा प्रस्ताव मंजूर करुन घेतला आहे. ठामपाने आरक्षित केलेला 30 एकरपैकी केवळ अर्धा एकर भूखंड ताब्यात घेऊन उरलेला भूखंड बड्या विकासकांसाठी आंदण म्हणून देण्याचा प्रयत्न पालिकेमध्ये सुरु आहे. एकूणच या ठिकाणी सिव्हरेज (मल:निस्सारण ) प्रकल्प कार्यान्वित झाल्यास बांधकामाला चांगला दर मिळणार नसल्यानेच एमसीएचआयच्या दावणीला पालिका बांधून उर्वरित भूखंड बिल्डरला आंदण दिला जात आहे. त्यासाठीच एमसीएचआयच्या दांडीयामध्ये सत्ताधारी नाचायला जात होतेे, अशी टीका विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, ठाणे महानगर पालिकेतील शिवसेनेचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे सभागृह नेते नरेश म्हस्के आणि ठामपा सचिव बुरपुल्ले यांनी संगनमताने ठामपाला लुटण्याचा डाव रचला आहे. सभागृहातील ठरावाची अंमलबजावणी करणे, ही सचिवांची जबाबदारी आहे. पण, सचिव सभागृहाचा सभागृहाचा अवमान करीत आहेत. चर्चा एक करुन ठराव दुसराच मंजूर केला जात आहे. त्यामुळे कार्यक्षम अशा आयुक्तांनी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरुन गोरगरीबांची बांधकामे पाडून रस्ता रुंदीकरणाची धडाडी दाखवली. त्याच पद्धतीने या ठिकाणीही धडाडी दाखवून सदरचा संपूर्ण भूखंड ताब्यात घ्यावा; गावदेवी येथील प्रबोधनकार ठाकरे व्यापारी संकुल जलकुंभाच्या आरक्षणासाठी पाडण्यात आले होतेे. तोच नियम येथे लागू करुन सदरचा भूखंड आयुक्तांनी ताब्यात घ्यावा, तसेच, चौथा मजला हा भ्रष्टाचाराचे कुरण झालेला असल्याने हा मजला सील करुन त्याची लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. शिवाय, बड्या बांधकाम व्यावसायिकांनी नियमबाह्य पद्धतीने आपल्या प्रकल्पांना मंजुरी मिळवून घेतली असल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे आयुक्तांनी त्यांच्या प्रकल्पांचीही चौकशी करावी, अशीही मागणी परांजपे यांनी केली आहे.