‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ शॉर्ट फिल्मला मिळाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 02:32 AM2018-09-28T02:32:26+5:302018-09-28T02:32:55+5:30
डेहराडून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये डोंबिवलीतील प्रतीक्षा साबळे-फुलवणे यांच्या ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ या शॉर्ट फिल्मला पुरस्काराने गौरवण्यात आले.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली - डेहराडून येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये डोंबिवलीतील प्रतीक्षा साबळे-फुलवणे यांच्या ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ या शॉर्ट फिल्मला पुरस्काराने गौरवण्यात आले. या फिल्मला मिळालेला हा तिसरा पुरस्कार आहे.
शालेय जीवनात विद्यार्थी दररोज प्रतिज्ञा म्हणतात. परंतु, त्याचा अर्थ त्यांना माहीत नसतो. शिक्षकही त्यांना तो कधी सांगत नाही. प्रतिज्ञेचा अर्थ समजून घेऊन ती आचरणात आणल्यास एक चांगली कुटुंबव्यवस्था आणि पर्यायाने समाज घडायला मदत होईल, अशा आशयाची ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ ही फिल्म आहे. त्यात पाच वर्षांची मुलगी शार्मीन फुलवणे हिने अभिनय केला आहे. या फिल्मला खूप नामांकने आणि तीन पुरस्कार मिळाले आहेत. दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला असल्याने आनंद होत आहे, असे प्रतीक्षा यांनी सांगितले. देशासाठी काही करायला आपल्याकडे वेळ नाही, पैसे नाही, असे आपण बोलतो. पण, ही फिल्म पाहून आपण केवळ मूल्ये सांभाळली तरी खूप आहे, असे मला वाटते. प्रत्येक भारतीयाने ही फिल्म एकदा तरी पाहिली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
प्रतीक्षा यांनी एक वर्षापूर्वी या फिल्मची निर्मिती केली आहे. फ्लिमचे स्क्रीन प्ले कल्पेश राणे, कॅमेरा रवी धनवे, ध्वनी केतकी चक्रदेव, पोस्टर डिझाइन संकल्प नलावडे, एडिटिंग पराग सावंत, प्रथमेश अवतारे, तर दिग्दर्शन प्रतीक्षा यांनी केले आहे. ही फिल्म इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांत तयार करण्यात आली आहे.
दिल्ली बलात्कार प्रकरण हे सर्व ऐकून मन सुन्न होत होते. म्हणून, समाजात एक चांगला संदेश देण्यासाठी ही शॉर्ट फिल्म तयार केली आहे, असे प्रतीक्षा म्हणाल्या. देशाच्या संरक्षणासाठी सैनिक आपला जीव धोक्यात घालून सीमेवर लढतात. पण, त्यांच्यामागे त्यांचे कुटुंब असते. त्या सैनिकांच्या मुलीने आपल्या आयुष्यात तिरंगा हा प्रथम आपल्या वडिलांच्या अंगावर पाहिला. त्यावेळी तिच्यासाठी त्या तिरंग्यातील तिन्ही रंगांचा अर्थ हा वेगळा असतो. ही फिल्म तीन मिनिटांची असली, तरी खूप काही सांगून जाते. ती मुलगी देशातील लोकांना सांगते की, तुम्ही घरात बसून वाईट कृत्य करून समाजात चुकीचा संदेश पसरवत आहात, हे या फिल्ममधून सांगितल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, डेहराडून येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ५५० फिल्म आल्या होत्या. त्यापैकी १७ फिल्मना पुरस्कार देण्यात आले. त्यात ‘प्लेज्ड सेल्फ कमिटमेंट’ ही शॉर्ट फिल्म होती. बॉलिवूडचे चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता असलेले विवेक वासवाणी यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा नुकताच पार पडला.
ज्योती-सावित्रीलाही पुरस्कार
प्रतीक्षा यांना लहानपणापासूनच लिखाणाची खूप आवड होती. त्यामुळे तेच सुरू ठेवावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. परंतु, अभिनयाची आवड असल्याने त्यांनी आपला अभिनयातील प्रवास पुढे सुरू केला. त्यांनी प्रथम ज्योती-सावित्री हे व्यावसायिक नाटक केले. त्याला संस्कृती कलादर्पण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. याशिवाय, अंगाईगीत चित्रपट तिने केला आहे.