ठाण्यात महायुतीच्या उमेदवाराचा पत्ता नसताना प्रचार दौऱ्याचे नियोजन
By अजित मांडके | Published: April 2, 2024 07:43 PM2024-04-02T19:43:51+5:302024-04-02T19:44:01+5:30
महायुतीची बैठकीत मेळाव्याचे नियोजन, कोअर कमिटीचीही स्थापना.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरुन मतभेदांचे दर्शन घडत आहे. शिवसेना, भाजपकडून दावे प्रतिदावे केले जात असतांना बुधवार पासून महायुतीच्या माध्यमातून मेळावा घेण्याची घोषणा मंगळवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार महायुतीचा पहिला मेळावा ठाण्यात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच या बैठकीच्या निमित्ताने महायुतीची एक कमिटीही गठीत करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
ठाणे लोकसभेसाठी उध्दव सेनेकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिंदे सेनेकडून अद्यापही उमेदवारी बाबत कमालाची गुप्तता पाळली जात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने, ही जागा शिवसेनेचा लढविणार असल्याचा दावा शिंदे सेनेकडून केला जात आहे. तर भाजपने देखील या मतदार संघावर दावा केला आहे. त्यातूनच मुख्यमंत्री शिंदे यांची अडचण मात्र वाढली आहे, त्यातून अद्यापही मार्ग निघू शकलेला नाही. आता पुढील दोन ते तीन दिवसात उमेदवार जाहीर केला जाईल असा दावा देखील दोनही पक्षाकडून केला जात आहे. एकूणच शिवसेना आणि भाजपकडून या जागेसाठी काथ्याकुट सुरु असतांनाच मंगळवारी महायुतीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महायुतीचे महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेअंतर्गत घेण्यात येणाºया मेळाव्यांची घोषणा देखील करण्यात आली आहे. त्यानुसार पहिला मेळावा हा ठाण्यात बुधवारी होणार आहे. बुधवारी सांयकाळी ६ वाजता हा मेळावा पार पडणार आहे. त्यानंतर ४ एप्रिल रोजी मिरा भार्इंदर आणि १० एप्रिल रोजी नवी मुंबईला महायुतीचा मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच या मेळाव्याच्या निमित्ताने लावण्यात येणाºया बॅनरवर प्रोटोकॉल कसा पाळला जावा, कोणते नेते भाषण करतील याचा पक्षनिहाय क्रमही ठरविण्यात आला. परंतु इथे उमेदवार अंतिम होत नसतांना बाकीचा क्रम मात्र महायुतीकडून लावला जात असल्याने हा आता चर्चेचा विषय झाला आहे.
कमिटीही तयार
लोकसभा निवडणुकीचे मेळावे, बैठका व इतर रुपरेषा ठरविण्यासाठी आणि महायुतीमध्ये एकमत रहावे या उद्देशाने एक कोअर कमिटी देखील तयार करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि राष्टÑवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा समावेश असून त्यांच्यासोबत ठाणे लोकसभा मतदार संघात येणाºया सहा विधानसभेतील महायुतीचे आमदार देखील त्यात असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ठाण्यातील शहनाई हॉल येथे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेकडून शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपकडून आमदार संजय केळकर, गीता जैन, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि राष्टÑवादीकडून प्रवक्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रभाकर सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन करण्यासाठी नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे आणि संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला होता.