कल्याण लोकसभा मतदारसंघात चार लाख घरापर्यंत गॅसपुरवठ्याचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:47 AM2021-09-09T04:47:44+5:302021-09-09T04:47:44+5:30
कल्याण : डोंबिवलीतील रिजन्सी गृहसंकुलातील १०० सदनिकाधारकांना पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसपुरवठा करण्यात येत आहे. या गॅस पाईपलाईनचा शुभारंभ मंगळवारी कल्याणचे ...
कल्याण : डोंबिवलीतील रिजन्सी गृहसंकुलातील १०० सदनिकाधारकांना पाईपलाईनद्वारे घरगुती गॅसपुरवठा करण्यात येत आहे. या गॅस पाईपलाईनचा शुभारंभ मंगळवारी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यात चार लाख घरापर्यंत गॅसपुरवठ्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सदानंद थरवळ, प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, सोसायटीचे जयवंत ढाणे आदी उपस्थित होते. रिजेन्सी हे बडे गृहसंकुल आहे.
रिजन्सी गृहसंकुलातील बाराशे सदनिकांना घरगुती गॅस पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. त्यापैकी १०० घरांचा गॅसपुरवठा मंगळवारपासून सुरू झाला आहे. उर्वरित ११०० सदनिकाधारकांनाही लवकर पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे. यापूर्वी डोंबिवली निवासी भागातील सदनिकाधारकांना गॅस पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा सुरू झाला आहे.
महानगर गॅसची पाईपलाईन कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात टाकण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात दोन लाख तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख अशा चार लाख घरांपर्यंत पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा केला जाणार आहे.
----------------------