कोरोनाला रोखण्यासाठी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:47+5:302021-04-20T04:41:47+5:30
कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. कल्याण ...
कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात येणार आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरोना नियमावलीचे पालन न केल्यास बाजार समिती बंद करण्याची तंबी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तांनी दिली आहे. त्याअनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समितीने नियोजन केले असल्याची माहिती समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी दिली आहे.
बाजार समितीच्या ४० एकर जागेत भाजीपाला, अन्यधान्य, फळबाजार भरतो. त्याठिकाणी पहाटे २ वाजल्यापासून ६ वाजेपर्यंत बाजार चालतो. याठिकाणी प्रत्येक शेतमालाकरिता वेगळ्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जात आहे. अन्नधान्य, फळबाजार, भाजीपाला, शेतमाल वाहनांकरिता वेगळे प्रवेशद्वार दिले आहे. तेथूनच तो माल बाजार समितीत येईल, अशी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांची एकाच प्रवेशद्वारातून गर्दी होणार नाही. कांदा, बटाट्याचा माल घेऊन येणाऱ्यांना दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बाजार समितीत धक्क्याला गाडी लावून माल खाली करता येणार आहे. अन्य वेळेत त्यांनी त्यांची गाडी पार्किंगमध्ये उभी करून ठेवायची आहे.
दररविवारी बाजार पूर्ण बंद ठेवला जात आहे. कोरोनामुळे बाजारात शेतमालाची आवक कमी झाली आहे. ज्या दिवशी आवक जास्त असते, त्यादिवशीही ग्राहक बाजार समितीत फिरकत नाहीत. त्यामुळे शेतमालाचा भाव ३० टक्क्यांनी कमी झाला आहे. बाजार समितीत किरकोळ खरेदीविक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे केवळ घाऊक बाजार चालविला जात आहे. किरकोळ मालाची विक्री करणाऱ्या वाहनांना बाजार समितीत आवारात प्रवेश दिला जाणार नाही. केवळ घाऊक विक्री करणाऱ्यांना शेतमालाच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे, असे चौधरी यांनी सांगितले.
--------------