हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येकाने एक झाड लावा; संजय राठोड यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 03:36 AM2020-07-02T03:36:12+5:302020-07-02T03:37:07+5:30
वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ, पर्यावरण जपणे गरजेचे
ठाणे : हरित महाराष्ट्रासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून ते जगवण्याचा निर्धार करावा, असे आवाहन राज्याचे वन व भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांनी बुधवारी केले. वनविभागाने आयोजित केलेल्या हरित महाराष्ट्र वृक्षलागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ बुधवारी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूर येथे झाला. त्याचाच एक भाग म्हणून राठोड यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातील मौजे शीळ पनवेल रोड भंडार्ली येथे वृक्षारोपण करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे व उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर आदी उपस्थित होते.
भारतीय वन सर्वेक्षण २०१९ च्या अहवालानुसार महाराष्ट्रात वनक्षेत्राचे प्रमाण ३०.१ टक्के इतके असून हे प्रमाण भारताच्या वनक्षेत्राच्या प्रमाणात ८.६५ टक्के इतके आहे. भारतीय वननीतीनुसार ते भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के एवढे क्षेत्र असावे, असे उद्दिष्ट राष्ट्रीय पातळीवर निश्चित केले आहे. या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी तसेच बदलत्या जागतिक वातावरणाचा समतोल राखण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
२०१७ च्या तुलनेत महाराष्ट्रातील वनक्षेत्रात वर्षभरात सुमारे ९७ हजार ५०० हेक्टरने वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे वनक्षेत्रावरील वृक्षाची वाढ होऊन महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी राहिले आहे. वृक्षलागवडीच्या चळवळीत जनतेचा सहभाग वाढावा, वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी तसेच जनतेला वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देता यावे या हेतूने राज्यात हरित महाराष्ट्र वृक्ष लागवड मोहीम आयोजित केली आहे
दरम्यान, २०२० ते २०२४ या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षी दोन कोटी याप्रमाणे एकूण १० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. यामुळे सर्व नागरिकांनी या मोहिमेमध्ये भाग घेऊन हरित महाराष्ट्र घडविण्याकरिता आपले योगदान द्यावे, असे आवाहन राठोड यांनी केले आहे
ठाणे जिल्ह्यात कृषी दिन सर्वत्र साजरा, बांधावर जाऊन देणार योजनांची माहिती
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने बुधवारी कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, कृषिक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती किशोर जाधव यांनी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी मनोजकुमार ढगे उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अति मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने यांनी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन आषाढी एकादशीचे औचित्य साधून बा. विठ्ठलाला देशावर, राज्यावर , जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होवो असे साकडे घातले.
जिल्हा प्रशासनामार्फत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेनुसार १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेऊन, शेतकऱ्यांच्या बांधावर कृषीविषयक योजनांची माहिती या कालावधीत दिली जाणार आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या शहापूर, अंबरनाथ, मुरबाड, कल्याण, भिवंडी आदी पंचायत समिती
कार्यालयातही कृषी दिन साजरा करण्यात आला.