रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील येऊरमध्ये वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 10:19 PM2019-05-26T22:19:05+5:302019-05-26T22:32:26+5:30
वेगवेगळया कारणांमुळे होणारी वृक्षतोड आणि वाढते तापमान यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी ठाण्यातील रुद्र प्रतिष्ठानने आठवडयातून दोन वेळा वृक्षारोपणाची एक अनोखी मोहीम ठाण्यात सुरु केली आहे.
ठाणे: ‘वृक्ष लावा, जीवन वाचवा’ या मोहिमेंतर्गत संस्कार एज्युकेशनल अॅन्ड चॅरिटेबल ट्रस्ट, संस्कार क्लासेस आणि रुद्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील येऊर परिसरात विद्यार्थ्यांनी रविवारी वृक्षारोपण केले. गेल्या काही महिन्यांमध्ये या संस्थेने हे १९ वे वृक्षारोपण केले.
गो ग्रीन रेव्हूलेशन अर्थात हरितक्रांती या उपक्रमांतर्गत रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने आठवडयातून दोन वेळा येऊरच्या परिसरात वृक्षारोपण केले जाते. याशिवाय, वृक्षारोपण केलेल्या झाडांच्या वृद्धीसाठी दररोज खत फवारणीही केली जाते. याशिवाय, त्यांच्या सुरक्षिततेसाठी लहान रोपांच्या भोवती लोखंडी जाळी किंवा लाकडी कुंपनही घातले जाते. प्रत्येक वेळी पाच वेगवेगळया रोपांचे रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण केले जाते. रविवारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय सिंह, सल्लागार धनंजय सिंह, शिवानंद ठाकूर , डॉ. किरण शेलार, रवी कुमार कुशवाह, सत्यप्रकाश शुक्ला, गोपाल ठाकूर आणि सिद्धार्थ कांबळे आदींनी हे वृक्षारोपण केल्याचे विनय सिंह यांनी सांगितले.