२० हजार वृक्षांची करणार लागवड
By admin | Published: June 10, 2017 01:09 AM2017-06-10T01:09:36+5:302017-06-10T01:09:36+5:30
अंबरनाथ तालुका पंचायत समिती या वर्षात २० हजार झाडांची लागवड व संवर्धन करणार आहे. गेल्या वर्षी पंचायत समितीने
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : अंबरनाथ तालुका पंचायत समिती या वर्षात २० हजार झाडांची लागवड व संवर्धन करणार आहे. गेल्या वर्षी पंचायत समितीने वृक्षारोपणाचे लक्ष्य पूर्ण केले होते. यंदाही लक्ष्य पूर्ण करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांनी सांगितले.
या वर्षी १७ हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात २० हजार झाडांची लागवड करून संवर्धन करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात २८ ग्रामपंचायती, २२६ शाळा, ११५ अंगणवाड्या, ५ पशुवैद्यकीय दवाखाने याबरोबरच पाझर तलाव, आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्राच्या जागा आहेत. या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचे तसेच संवर्धनाचे नियोजन केले आहे. या सर्व ठिकाणी झाडे लावण्यात येणार आहेत. काही ठिकाणी फळझाडेही लावली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही सर्व झाडे १८ महिन्यांची असून सात फूट उंचीची झाडे लावण्यात येणार आहेत. एकदा ही झाडे जगली की, वाढत जाणार आहेत. त्यामुळे वृक्षसंवर्धन सोपे होणार आहे. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या झाडांपैकी निम्म्यापेक्षा अधिक झाडे जगलेली आहेत. गेल्या वर्षीच्या काही त्रुटींचा अभ्यास करून त्यात सुधारणा केल्याने या वर्षी लावण्यात येणारी बहुतांश झाडे जगणार असल्याचा दावा सोनटक्के यांनी केला आहे.