वटपौर्णिमेच्या दिवशी केले वडाच्या झाडाचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:18+5:302021-06-25T04:28:18+5:30
वृक्षारोपणानंतर वडाचे घेतले पालकत्व लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वटपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील किशोरी गुप्ते यांनी अभिनव संकल्पनेतून गुरुवारी हा सण ...
वृक्षारोपणानंतर वडाचे घेतले पालकत्व
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वटपौर्णिमेनिमित्त ठाण्यातील किशोरी गुप्ते यांनी अभिनव संकल्पनेतून गुरुवारी हा सण साजरा केला. वडाची फांदी तोडून ती पूजण्यापेक्षा वडाच्या झाडाचे त्यांनी रोपण केले. केवळ रोपण करून न थांबता त्यांनी या वडाचे पालकत्व स्वीकारले आहे.
वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो, अशी धारणा बराच काळापासून रुढ आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. वड हा वृक्ष अनेक वर्षे आयुष्य असणारा भक्कम वृक्ष. पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात. लॉकडाऊनमुळे अनेक महिलांनी बाहेर जाऊन वडाची पूजा करण्याऐवजी वडाची फांदी घरात आणून घरच्याघरी पूजा केली. परंतु या परंपरेला छेद देत गुप्ते यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने सण साजरा केला. पर्यावरणाचे रक्षण व्हावे आणि देशी झाडांचे रोपण व्हावे या हेतूने त्यांनी साकेत येथे गुरुवारी सकाळी वडाचे झाड लावले व त्याचे पालकत्व स्वीकारले. झाडांची कत्तल होत असल्याने पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. केवळ झाडे न लावता ते झाड दत्तक घेतले पाहिजे, असे मत गुप्ते यांनी व्यक्त केले. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची तोडलेली फांदी आणून पूजा करण्यापेक्षा वडाच्या झाडाचे चित्र कागदावर रेखाटून त्याची प्रतीकात्मक पूजा करण्यास त्यांनी आतापर्यंत प्राधान्य दिले आहे.
----------
फोटो मेलवर
..........
वाचली