नावातील साधर्म्यामुळे प्लाझ्मा दुसऱ्या रुग्णास दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:07+5:302021-04-08T04:41:07+5:30
मीरा रोड : भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील एका रुग्णास देण्यासाठी आणलेला प्लाझ्मा नावाच्या साधर्म्यामुळे चक्क दुसऱ्या रुग्णास दिल्याच्या ...
मीरा रोड : भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील एका रुग्णास देण्यासाठी आणलेला प्लाझ्मा नावाच्या साधर्म्यामुळे चक्क दुसऱ्या रुग्णास दिल्याच्या बेजबाबदार प्रकाराने खळबळ उडाली आहे.
३० मार्च रोजी तुलसीराम पांड्या यांना कोरोनाची लागण झाल्याने जोशी रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची प्रकृती बिघडत चालल्याने ५ एप्रिल रोजी त्यांना पहिल्यांदा प्लाझ्मा चढवण्यात आला. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा न झाल्याने पुन्हा एकदा प्लाझ्मा चढवण्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यामुळे नातलगांनी धावपळ करून भांडुप येथून तब्बल ४० हजार रुपये खर्चून प्लाझ्मा मिळवला आणि तो रुग्णालयाच्या सुपूर्द केला.
दरम्यान, ६ एप्रिलला रुग्णालयात तुळसीदास कूळ नावाच्या कोरोना संशयित रुग्णास दाखल करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवालही यायचा होता. परंतु दोन्ही रुग्णांच्या पहिल्या नावातील साधर्म्य पाहता तुलसीराम ऐवजी तुळशीदास यांना प्लाझ्मा चढवण्यात आला.
जोशी रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजश्री सोनावणे म्हणाल्या की, एका रुग्णासाठी आणलेला प्लाझ्मा चुकून दुसऱ्या रुग्णास दिला आहे. असं काही झालं असेल तर दोषींवर कारवाई करू. आपण स्वतः याची माहिती घेत आहोत. ज्या रुग्णाला गरज होती त्याला रुग्णालयाच्या वतीने प्लाझ्मा मिळवून दिला जाईल.
ज्यांना प्लाझ्मा दिला गेला त्यांचा मुलगा सचिन यांनी सांगितले की, मंगळवारी माझ्या वडिलांना जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा चाचणी अहवालच अजून आलेला नाही. असे असताना त्यांना प्लाझ्मा देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती अजून आहे तशीच आहे.