उल्हासनगरमध्ये इमारतीचे प्लास्टर पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:44 AM2021-05-20T04:44:06+5:302021-05-20T04:44:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : मोहिनी इमारतीची दुर्घटना ताजी असताना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता साईसदन इमारतीचे प्लास्टर पडल्याने, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : मोहिनी इमारतीची दुर्घटना ताजी असताना मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता साईसदन इमारतीचे प्लास्टर पडल्याने, नागरिकांत खळबळ उडाली. याप्रकाराने भयभीत झालेल्या नागरिकांना इमारतीबाहेर काढून सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले. रात्री इमारत सील करून त्याभोवती लोखंडी बॅरिकेड्स लावण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त तुषार सोनावणे यांनी दिली, तर दुसऱ्या घटनेत एका दुमजली इमारतीचा स्लॅब कोसळला. दरम्यान, आठवड्यातील ही तिसरी घटना असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उल्हासनगरात मोहिनी इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू, तर दहा जण जखमी झाले. ही दुर्घटना ताजी असताना कॅम्प नं. २, झुलेलाल मंदिर परिसरातील साई सदन इमारतीतून मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता प्लास्टर पडू लागले. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी इमारत कोसळणार या भीतीने बाहेर धावत गेले. महापालिका प्रभाग समिती क्रमांक २ चे सहायक आयुक्त सोनावणे यांच्यासह टीमने घटनास्थळी धाव घेऊन इमारतीमध्ये राहणाऱ्या चार कुटुंबांना बाहेर काढून पर्यायी राहण्याची व्यवस्था केली. मात्र त्यांनी नातेवाइकांकडे जाण्यास प्राधान्य दिले.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत कॅम्प नं. ४, श्रीराम चौकाशेजारील आरके टेडर्स या दुमजली इमारतीचा स्लॅब मध्यरात्री कोसळला. इमारतीमध्ये कोणी नसल्याने जीवितहानी टळली. महापालिका पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.