ठामपा मुख्यालयात प्लास्टर पडले
By admin | Published: April 26, 2017 11:56 PM2017-04-26T23:56:55+5:302017-04-26T23:56:55+5:30
एकीकडे ठाणे महापालिकेने मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढली असतानाच बुधवारी सकाळी त्याच्या पहिल्या मजल्यावरील जाहिरात
ठाणे : एकीकडे ठाणे महापालिकेने मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी निविदा काढली असतानाच बुधवारी सकाळी त्याच्या पहिल्या मजल्यावरील जाहिरात विभागाबाहेरील बाजूच्या भिंतीचे प्लास्टर कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरीदेखील मुख्यालय इमारत आता धोकादायक ठरू लागल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी अनेक प्रकारची दुरुस्ती तसेच वाढीव बांधकामे होऊ लागल्यानेच तिचे आयुर्मान कमी होऊ लागल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील प्लास्टर कोसळून एक महिला किरकोळ जखमी झाली होती. त्यानंतर, त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीच त्याचे स्ट्रक्चरल आॅडिट केले असून येत्या १५ ते २० दिवसांमध्ये दुरु स्तीला सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. यासाठीची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली असून त्याकरिता ६ कोटींची तरतूद केल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये मुख्यालय आणि गडकरी रंगायतन धोकादायक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दुरुस्तीचा निर्णय पालिकेने घेतला होता. महापालिका मुख्यालय इमारतीचे बांधकाम १९८९ मध्ये झाले असून त्या बांधकामास आता २७ वर्षे झाली आहेत. स्ट्रक्चरल आॅडिटनुसार या इमारतीचे बांधकाम सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी इमारतीतील काही दुरु स्तीची कामे वारंवार होत असून काही नव्या केबिनही बनवल्या जात आहेत. त्यामुळेच इमारतीचे आयुर्मान आता कमी होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)