ग्राहकांच्या हाती पुन्हा प्लास्टिक पिशव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:30 AM2021-02-19T04:30:47+5:302021-02-19T04:30:47+5:30
प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी राज्य शासनाने मार्च २०१८ मध्ये कायदा केला होता. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर ...
प्लास्टिक पिशव्यांच्या वाढत्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी राज्य शासनाने मार्च २०१८ मध्ये कायदा केला होता. त्यानंतर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीमही राबवली होती. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर शासकीय संस्थांवर जबाबदारी दिली होती. मात्र, दोन वर्षांच्या काळात सर्वच शासकीय संस्थांना प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्यात अपयश आले. बाजारात फेरीवाले, दुकानदार तसेच इतर साहित्य विक्रेत्यांकडून बंदी असलेल्या आणि कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर वाढल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरात पालिका आणि इतर शासकीय संस्था कोरोनाच्या कामात व्यस्त असल्याने प्लास्टिकच्या पिशव्यांच्या गोदामातून सर्रासपणे विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर अशा शहरांत, स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले फेरीवाले, भाजी विक्रेते यांच्यासह दुकानदारांकडूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. याबाबत अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी सुरेश पाटील यांना विचारले असता प्लास्टिक पिशव्यांवर धडक कारवाई होत नसली तरी किरकोळ कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
...........................