प्लास्टीक पिशव्यांच्या कारखान्यावर धाड, एक टनापेक्षा जास्त पिशव्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 09:34 PM2018-08-02T21:34:57+5:302018-08-02T21:35:38+5:30
शहराच्या संतोषनगर शिवसेना शाखेसमोरील उद्योग कंपाऊंडमधील प्लास्टीक कारखान्यावर महापालिका पथकाने धाड टाकली. येथे प्लास्टीक पिशव्यांचा कारखाना सुरू असून एक टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचा साठा मिळाला.
उल्हासनगर : शहराच्या संतोषनगर शिवसेना शाखेसमोरील उद्योग कंपाऊंडमधील प्लास्टीक कारखान्यावर महापालिका पथकाने धाड टाकली. येथे प्लास्टीक पिशव्यांचा कारखाना सुरू असून एक टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्यांचा साठा मिळाला. त्यानंतर, हा कारखाना सील करण्यात आला आहे. उल्हासनगरात अनेक प्लास्टीक कारखाने असून मुंबई, ठाणे, उपनगर, कल्याण, डोंबिवली आदी अनेक भागात प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा केला जातो.
राज्य सरकारने प्लास्टीक पिशवी बंदी केल्याने, अनेक कारखाने बंद झाले आहेत. त्यातील काही कारखाने गुजरात राज्यात स्थलांतरीत झाले आहेत. मात्र, सध्याही अनेक प्लास्टीक पिशव्यांचे कारखाने चोरुन-छपून सुरू असल्याचे, आजच्या कारवाईने उघड झाले. महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केने, एकनाथ पवार, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मुकादम श्याम सिंग, विश्वनाथ राठोड, मयूर परब, रविंद्र पाटील, वसंत फुलोरे यांना संतोषनगरातील शिवसेना शाखे समोरील औद्योगिक कंपाउंडमध्ये अक्षर प्लास्टीक नावाचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी गुरुवारी सायंकाळी 7 वाजता कारखान्यावर धाड टाकली असता, प्लास्टीक पिशव्या निर्माण करीत असल्याचे उघड झाले. या कारखान्यात एक टनापेक्षा जास्त प्लास्टीक पिशव्याचा साठा आढळून आला कारखाना सिलबंद केला.
उल्हासनगर महापालिकेने सुरवातीला प्लास्टीक पिशव्याविरोधात मोठी कारवाई केली. दोन दिवसात 40 पेक्षा जास्त जणांवर कारवाई करून अडीच लाखांचा दंड वसूल केला होता. मात्र, त्यानंतर ही कारवाई थांबवली. प्लास्टिक कारखानदार व मुख्य प्लास्टिक विक्रेत्यांनी महापौर, आयुक्त यांना साकडे घातल्याने कारवाईला ब्रेक लागल्याचे बोलले जाते. तसेच अनेक प्लास्टीक कारखाने सुरू असल्याचीही माहिती आहे.