उपायुक्तांच्या स्वच्छता सर्वेक्षणात आढळल्या प्लास्टिक पिशव्या, दुकानदारांकडून एक लाख ३५ हजार दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 02:19 AM2020-12-10T02:19:22+5:302020-12-10T02:19:28+5:30

Mira Bhayander News : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची सुरुवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्याकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या आहेत .

Plastic bags found in Deputy Commissioner's Sanitation Survey | उपायुक्तांच्या स्वच्छता सर्वेक्षणात आढळल्या प्लास्टिक पिशव्या, दुकानदारांकडून एक लाख ३५ हजार दंड वसूल

उपायुक्तांच्या स्वच्छता सर्वेक्षणात आढळल्या प्लास्टिक पिशव्या, दुकानदारांकडून एक लाख ३५ हजार दंड वसूल

Next

मीरा राेड - स्वच्छ भारत अभियानअंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेची सुरुवात महापालिकेने केली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्तांना दुकानदार व फेरीवाले यांच्याकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळल्या आहेत . त्यांच्यावर कारवाई करत एक लाख ३५ हजार दंड वसूल करत पिशव्या जप्त केल्या गेल्या.
आयुक्त डॉ . विजय राठोड यांनी पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना विविध परिसराचे पालकत्व दिले आहे. आरोग्य विभागाने शहरात स्वच्छता ठेवणे, नागरिकांनी ओला-सुका करणे, प्लास्टिक पिशव्यांवर कारवाई करणे, अतिक्रमण विभागाने रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण, बेवारस वाहने हटवणे, बांधकाम विभागाने रस्त्यावरील डेब्रिज हटवून स्वच्छतागृहांची स्वच्छता ठेवायची आहे. पाणीपुरवठा विभागाने खड्डे बुजवणे, मलनिःसारण केंद्र सफाई करणे आदी कामे करायची आहेत. वृक्ष प्राधिकरण, शिक्षण, नगररचना विभागांनाही त्यांच्या अखत्यारीतील कामांच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
स्वच्छतेची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी त्यांच्या स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी आदींसह मोहिमेस सुरुवात केली असता त्यांना दुकानदार आणि फेरीवाल्यांकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा आढळला. 
शहरात प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेल्या एकदा वापरातील प्लास्टिक वस्तूंची सर्रास विक्री आणि वापर होत असल्याच्या बातम्या ‘लोकमत’ने सातत्याने दिल्या होत्या. 

दुसरीकडे मात्र पालिका कारवाई करत असल्याचा दावा करत होती. परंतु पालिकेचा दावा हा कांगावा असल्याचे पानपट्टे यांच्या कारवाईने पुन्हा उघड झाले आहे. दरम्यान, शहरात या आधीही बंदी असलेल्या पिशव्यांचा वापर सर्रास हाेऊनही पालिकेकडून ठाेस कारवाई केली जात नव्हती.

प्लास्टिक पिशव्या आणि अन्य बंदी असलेल्या प्लास्टिक वस्तूंवर पालिका नियमित कारवाई करणार आहे. अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षी शहराचा देशात १९वा तर महाराष्ट्रात चौथा क्रमांक आला होता. कचरामुक्त शहर म्हणून तीन तारांकित तसेच हागणदारीमुक्त कार्यामुळे ओडीएफ म्हणून गौरवण्यात आले होते. त्यामुळे या वर्षी प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पालिका प्रयत्न करणार आहे. 
   - डॉ. संभाजी पानपट्टे,  उपायुक्त
 

Web Title: Plastic bags found in Deputy Commissioner's Sanitation Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.