शहापूर पोलीस ठाण्याला प्लास्टिकचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:58+5:302021-06-30T04:25:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क किन्हवली : तालुक्यातील शेकडो गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत असलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हवली
: तालुक्यातील शेकडो गावातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यरत असलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचा कारभार मात्र वर्षानुवर्षे पडक्या कौलारु खोल्यात सुरु आहे. पावसाळ्यात पाणी गळत असल्याने या खोल्यांना प्लास्टिकचा आधार घ्यावा लागतो. याबाबत पोलीस प्रशासनाने व बांधकाम विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता असून या ठिकाणी सुसज्ज इमारत होणे गरजेचे आहे.
शहापूर पोलीस ठाणे अंतर्गत खर्डी, शहापूर नगरपंचायत, सरलंबे, धसई, अघई या भागासह शेकडो गावांचा कारभार पाहिला जातो. भातसा, तानसा, वैतरणा धरणाच्या सुरक्षेसह गावातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूककोंडीबाबत काम पाहिले जाते.
तालुक्याचे ठिकाण शहापूर असल्याने येथे दररोज वर्दळ असते. सरकारी कार्यालय याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने मोर्चे ,आंदोलन होतात. त्यामुळे पोलीस प्रशासनाला याबाबतही काम करावे लागते. गेली अनेकवर्षे पोलीस ठाण्याला सुसज्ज इमारत बांधता आलेली नाही. कौलारू खोल्यांमध्ये कामकाज चालते. स्वच्छतागृहाची सुविधा पोलीस प्रशासनाने स्वखर्चात केली असली तरीही इतर सुविधांपासून अजूनही वंचित आहे.
पोलीस ठाणे परिसरात पुरेशी जागा नसल्याने जप्त केलेली वाहने याच ठिकाणी ठेवली आहेत.
पोलीस कर्मचारी ना कामकाज करण्यासाठी पुरेसे फर्निचर व इतर सामग्रीही नाही. पावसाळ्यात खोल्यांमध्ये गळती होते. तसेच उन्हाळ्यात खूप गरम होते. पोलिसांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था नसून तुरुंगाचीही बिकट अवस्था आहे.