प्लॅटेनियम रुग्णालय पालिकेने घेतले भाड्याने, दरमहा २० लाखांचा खर्च; भाजपचा विराेध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 11:32 PM2020-12-06T23:32:32+5:302020-12-06T23:33:34+5:30
Ulhasnagar News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करीत महापालिकेने शांतीनगर येथील खासगी प्लॅटेनियम रुग्णालय दरमहा २० लाख भाड्याने घेतले आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करीत महापालिकेने शांतीनगर येथील खासगी प्लॅटेनियम रुग्णालय दरमहा २० लाख भाड्याने घेतले आहे. भाजपने खासगी रुग्णालय भाड्याने घेतल्यावर टीका केली असून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याने कोरोना महामारीत सरकारी प्रसूतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन कोविड रुग्णालय उभारले. तसेच सामाजिक संस्थेचे रेड क्रॉस रुग्णालय, कामगार रुग्णालय, महापालिकेची अभ्यासिका, खासगी वेदांत कॉलेज, आयटीआय कॉलेज, तहसील कार्यालयाची नवी इमारत आदी ठिकाणे ताब्यात घेऊन आरोग्य केंद्र उभारले. दरम्यान, कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर बहुतांश आरोग्य केंद्र ओस पडली. दरम्यान, कोरोना रुग्णांवर त्वरित उपचार होण्यासाठी महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये १०० बेडचे तात्पुरते रुग्णालय उभारले.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने महापालिकेने उभारलेली अनेक आरोग्य केंद्रे ओस पडली. असे असताना स्थायी समितीत आयत्यावेळी प्लॅटेनियम रुग्णालय भाड्याने घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालयासाठी दरमहा २० लाख भाडे देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, मनोज लासी आदींनी याला विरोध केला आहे. पालिकेने उभारलेल्या आरोग्य केंद्रात कोरोना रुग्ण नसताना, दरमहा २० लाख रुपये खर्चून रुग्णालय भाड्याने घेण्याचा घाट कुणासाठी, असा प्रश्न केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही पुरस्वानी यांनी केला आहे.
रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात?
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने शहरात प्लॅटेनियम हे पहिले खासगी कोविड रुग्णालय उभे राहिले. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. तसेच रुग्णांवर कमी किमतीत उपचार होण्यासाठी १८ लाख रुपये खर्चून ऑक्सिजन पाइपची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र त्यानंतरही रुग्णांना सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप मनसेने केला होता. तेच रुग्णालय महापालिकेने भाड्याने घेतल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत.