पालिकेच्या मैदानात पार्र्किं ग; कोणार्कला दंड
By admin | Published: August 27, 2015 12:31 AM2015-08-27T00:31:54+5:302015-08-27T00:31:54+5:30
महापालिकेची मैदाने घंटागाड्या पार्किंगसाठी विनापरवाना वापरल्याप्रकरणी कोणार्क कंपनीला १ कोटी ८२ लाखांचा भुर्दंड बसला आहे. तसेच मैदानातून गाड्या हलविण्याचे आदेश
उल्हासनगर : महापालिकेची मैदाने घंटागाड्या पार्किंगसाठी विनापरवाना वापरल्याप्रकरणी कोणार्क कंपनीला १ कोटी ८२ लाखांचा भुर्दंड बसला आहे. तसेच मैदानातून गाड्या हलविण्याचे आदेश उपायुक्त नितीन कापडनीस यांनी काढले आहेत.
उल्हासनगर महापालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क कंपनीला दिला आहे. दोन वर्षांपासून कंपनी कचरा उचलण्याच्या गाड्या दसरा मैदान, गोल मैदान, व्हीटीसी मैदान व सपना गार्डन येथे विनापरवाना पार्किंग करीत आहे. पार्किंग केलेल्या गाड्या हटविण्याचे आदेश पालिकेने देऊनही त्याकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे. अखेर, उपायुक्त नितीन कापडनीस यांनी दरमहा ९ लाख १२ हजारांप्रमाणे २० महिन्यांचे १ कोटी ८२ लाखांचे भाडे आकारले आहे. आता भाडे रद्द करण्यासाठी कंपनी संचालकांनी आयुक्तासह स्थानिक नेत्यांच्या घराचे उंबरठे झिजवित आहेत.
कोणार्कच्या मागणीनुसार पालिकेने जुन्या जकात कार्यालयाची जागा कंपनी कार्यालयाला मोफत दिली. मात्र, जकात कार्यालया समोरील कोंडवाडा पाडून त्या जागी संरक्षण भिंत उभारल्याचा प्रकार कंपनीने केल्याने एमआरटीपीअंतर्गत कारवाईची मागणी झाली होती. अखेर, राजकीय हस्तक्षेपानंतर कोंडवाडा बांधून देण्याचे आश्वासन दिल्यावर अद्यापही ते बांधले नाही. तसेच कार्यालयासमोर गाड्या पार्किंग होत असल्याने वाहतूककोंडी होऊन परिसरात दुर्गंधी पसरल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कचरा उचलण्याच्या गाड्या पार्किंगसाठीची व्यवस्था कंपनीने करायची असल्याचे अटी व शर्तीत असताना पालिका मैदानात पार्किंग केल्यास यापुढे कंपनीला दरमहा भाडे आकारले जाणार असल्याचे उपायुक्त नितीन कापडनीस यांनी दिली. (प्रतिनिधी)