अंबरनाथमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ; मुदतबाह्य औषध दिल्याने 12 जणांची तब्येत बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 12:28 AM2019-12-03T00:28:02+5:302019-12-03T02:05:32+5:30
इंजेक्शन सोबत काही औषधे देखील या रुग्णांना देण्यात आली होती.
अंबरनाथ : येथील रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. मुदतबाह्य औषध दिल्याने १२ रुग्णांना सोमवारी रात्री उशीरा रक्ताच्या उलट्या झाल्या. यातील तीन रुणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित ८ ते ९ रुग्णांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबरनाथच्या छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या आठ ते दहा रुग्णांना अँटिबायोटिक औषध देण्यात आले होते. त्यातील काहीही इंजेक्शन हे रुग्णांच्या जीवावर बेतले आहेत.
हे इंजेक्शन मुदतबाह्य झालेले असतानादेखील चुकीचे स्टिकर आणि चुकीच्या तारखेचे स्टिकर लावून त्याचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. इंजेक्शनसोबत काही औषधेदेखील या रु ग्णांना देण्यात आली होती. त्यामुळे नेमक्या कोणत्या औषधांमुळे हा त्रास झाला आहे याचा पोलीस आणि वैद्यकीय विभाग तपास करीत आहे. घडलेल्या प्रकारानंतर छाया रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालयातच संताप व्यक्त केला. पोलिसांनीदेखील अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त ठेवला होता.