नाट्यसंमेलनाआधी ठाण्यात संगीत नाटके
By admin | Published: February 5, 2016 02:46 AM2016-02-05T02:46:31+5:302016-02-05T02:46:31+5:30
ठाण्याच्या नाट्यचळवळीची बीजे मो.ह. विद्यालयात रोवली गेली आणि त्या चळवळीची आठवण, शाळेचा बहुमान म्हणून नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमांना या
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे
ठाण्याच्या नाट्यचळवळीची बीजे मो.ह. विद्यालयात रोवली गेली आणि त्या चळवळीची आठवण, शाळेचा बहुमान म्हणून नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमांना या शाळेतूनच सुरुवात होणार आहे. १२ व १३ फेब्रुवारीला रसिक श्रोत्यांना या शाळेत संगीत नाटकांची मेजवानी दिली जाणार आहे. त्यातून ठाण्यातील नाट्यसंमेलनाचा आवाज प्रथम मो.ह. विद्यालयात घुमत जाईल.
ज्या वेळी ठाण्यात नाट्यगृहे नव्हती, तेव्हा मो.ह. विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात नाटके आयोजित केली जात. तेथूनच नाट्यसंस्कृतीचा प्रसार होऊ लागला. नाट्यसंस्कृतीची बीजे या शाळांत रोवली गेल्यामुळे त्या वास्तूंचा सन्मान म्हणून नाट्यसंमेलनाच्या कार्यक्रमांची सुरुवातच मो.ह. विद्यालयात होणार आहे. याबाबत, आयोजन समितीने दोन दिवसांपूर्वी शाळेला अधिकृतरीत्या कळविल्याचे मो.ह. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र राजपूत यांनी सांगितले. ठाणेकरांना दोन दिवस सायंकाळी ६ ते १० या वेळेत ही संगीत नाटके पाहता येणार आहेत. ‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक व्हावे, यासाठी आयोजक प्रयत्नशील असल्याचे राजपूत यांनी सांगितले.
शाळेला हा बहुमान मिळाल्यामुळे शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठीच्या समितीची स्थापना करण्यात आली असून स्नेहा शेडगे या समितीच्या प्रमुख आहेत. मेकअप रूम कुठे असेल, लाइट्स कुठून देता येतील, पडदे नेमके कुठे बांधावे, अशी तयारी शाळेत उत्साहात सुरू आहे. या दोन दिवसांत शाळेत जे-जे मान्यवर येतील, त्यांच्या स्वागतासही शाळा सज्ज झाली आहे.